पिंपरी : प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत नटसम्राट निळू फुले रंगमंदिर | पुढारी

पिंपरी : प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत नटसम्राट निळू फुले रंगमंदिर

वर्षा कांबळे : 
पिंपरी : पिंपळे गुरवसारख्या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी 2017 मध्ये नटसम्राट निळू फुले रंगमंदिर उभारण्यात आले. यापूर्वी या परिसरातील नागरिकांना नाटक पाहण्यासाठी पुणे किंवा चिंचवड येथे जावे लागायचे. चार वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या रंगमंदिरात थोड्याफार समस्या सोडल्या तर याठिकाणी नाटकापेक्षा कार्यक्रमांना जास्त पसंती आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या रंगमंदिरास प्रेक्षकांची प्रतीक्षा आहे. रंगमंदिर अवघ्या चार वर्षांपूर्वी बांधलेले असल्याने थोडी फार दुरवस्था असली तरी रंगरंगोटी, रंगमंच, आसन व्यवस्था, ध्वनियंत्रणा, स्वच्छता अतिशय चांगली आहे.

मात्र, नाटकांऐवजी इतर कार्यक्रमांनाच येथे अधिक मागणी आहे.  रंगमंदिर बांधल्यानंतर सुरुवातीचे काही महिने वगळता नाटकांचे प्रयोग फार अपवादाने झाले. महिन्यातून एखाद्या नाटकाचा प्रयोग येथे होतो. मात्र, रसिक प्रेक्षकांसाठी हे रंगमंदिर आड बाजुला असल्याने प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद लाभत नाही.

रंगमंदिर सुरु झाल्यानंतरही त्याचा वापर जास्त प्रमाणात झाला नाही. यानंतर दोन वर्षांनी कोरोनाचा काळ, लॉकडाऊनचे निर्बंध यामुळे रंगमंदिर पूर्णपणे बंद होते. कोरोनानंतरच्या परिस्थिती देखील नाट्यगृहाचा वापर नाटकांसाठी कमी आणि कार्यक्रमांसाठी जास्त होत आहे. रंगमंदिर साडेपाचशे आसन क्षमतेचे आहे. महापालिकेच्या इतर नाट्यगृहाच्या तुलनेत आसन क्षमता कमी आहे.

रंगमंदिराचे उत्पन्न
नाट्यगृहाचे उत्पन्न हे एप्रिल ते मार्च असे धरण्यात येते. रंगमंदिराचे एप्रिल ते जुलै आजपर्यंत पाच ते साडेपाच लाख इतके उत्पन्न आहे. यामध्ये बाल नाटके 2 प्रयोग, तू म्हणशील तसं नाटकाचे 4, 38 कृष्णलिला 2, सारखं काही तरी होतंय 1 प्रयोग झाला. बाकी सर्व इतर सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम झाले.

कँटीन नाही
एवढ्या प्रशस्त रंगमंदिरामध्ये कँटीनची सुविधा नाही. टेबल मांडून फक्त काऊंटर तयार करण्यात आले आहे. यामध्ये वॉशबेसिनची सुविधा नाही. नाट्य संस्था किंवा कार्यक्रम घेणार्‍या संस्था यांनी पदार्थ विकत आणून त्याचे वाटप करायचे आहे. रंगमंदिरात वॉटर कुलर ठेवण्यात आले आहेत पण कँटीनच्या शेजारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

पार्किंगची समस्या
वाहने पार्किंगमधून बाहेर काढण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने कलाकार व रसिकांची गैरसोय होत आहे.

मेकअप रुमचा दरवाजा तुटलेला, पीयूपी छत पडलेले
रंगमंदिरात कार्यक्रम आणि नाटके यांना अल्प प्रतिसाद असला तरी तसेच मेकअप रुममधील चेंजिंग रुमचे दरवाजे तुटलेले आहेत. याठिकाणी पडद्याची व्यवस्था केली आहे. तसेच रंगमंदिराच्या वरील हॉलमध्ये पीयूपी छताचे एक दोन भाग पडले आहेत.

नाटकाचा फलक चुकीच्या ठिकाणी
प्रत्येक नाट्यगृहाच्या ठिकाणी नाटकाचा मोठा जाहिरात फलक लावण्याची व्यवस्था असते. रंगमंदिराच्या ठिकाणी जाहिरात फलक आहे. मात्र, तो अशा ठिकाणी बसविला आहे की, नागरिकांना कोणते नाटक आणि कार्यक्रम आहे हे दिसत नाही. फलकाच्या समोरच दोन विद्युत रोहित्र बसविण्यात आले आहेत. या विद्युत रोहित्रांचा अडथळा फलकास होत आहे.

काही किरकोळ दुरुस्त्या असतील त्या व्यवस्थापकांना विचारून स्थापत्य विभागाकडून करून घेऊ. काही गोष्टी असतील त्या पाहून घेतो.
               -विजयकुमार थोरात, ‘ह’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी

 

Back to top button