हिवरे येथील जागेचा बनावट एनए आदेश; फसवणुकीबद्दल सासवड पोलिसांत गुन्हा | पुढारी

हिवरे येथील जागेचा बनावट एनए आदेश; फसवणुकीबद्दल सासवड पोलिसांत गुन्हा

सासवड; पुढारी वृत्तसेवा: हिवरे (ता. पुरंदर) येथील गट नं. 829 व इतर चार गटांतील शेतजमिनीची फाळणी बारानुसार प्लॉटच्या नोंदी करण्यासाठी तलाठ्याकडे प्रकरण आले असता, सादर केलेली एन. ए. ऑर्डर (अकृषिक आदेश) बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे संबंधित शेतजमिनीच्या गटाचे मालक अल्ताफ हुसेन बाबासाहेब पटेल (रा. फ्लॅट नं. 1101, विंग ए – 7 रॉसरी बिल्डिंग, सोलापूर रोड, उदयबाग, पुणे 13) याच्याविरुद्ध पुरंदर तालुका तहसील कार्यालयातर्फे निवासी नायब तहसीलदार दत्तात्रेय भिकाजी गवारी यांनी तक्रार दाखल केली.

सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवरे येथील गट नं.829, 830, 831, 832, 833 या गटाचे मालक अल्ताफ हुसेन बाबासाहेब पटेल हे मार्च 2022 मध्ये हिवरे गावचे तलाठी नीलम देशमुख यांच्याकडे गेले. त्यांनी संबंधित गटांच्या क्षेत्राचे फाळणीबारानुसार प्लॉटच्या नोंदी करता येतील का? असे विचारले. तसेच, त्यांच्याकडे असलेली एन. ए. ऑर्डर (एनए/एसआर / 45/2015) दाखवली. त्यावर तलाठी देशमुख यांनी सदर ऑर्डरनुसार नोंद करता येते की नाही, तुम्ही कमी-जास्त पत्रक करून आणा त्याशिवाय नोंदी धरता येणार नाहीत, असे सांगितले.

त्यानंतर सासवडच्या उपविभागीय अधिकारी यांनी तलाठी देशमुख यांच्याकडे सदर गटाचा पंचनामा करून मागितला. त्याप्रमाणे त्यांनी पंचनामा सादर केला. उपविभागीय अधिकार्‍यांनी गट नं. 829 व इतर बाबतच्या बिनशेती आदेशाची एसआर रजिस्टरची प्रत सादर करण्यास सांगितले. त्या पत्राच्या अनुषंगाने अभिलेख कक्षात शोध घेतला असता, सदर प्रकरण आढळले नाही. तसेच, अकृषिक नोंदीतही सदर आदेशाची नोंद आढळली नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी पटेल विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे तहसीलदारांना कळविले. तहसीलदारांनी पटेलवर बनावट ऑर्डर तयार करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार सासवड पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button