पिंपरी :  दुरुस्तीसाठी ‘पॅच’ लावल्याने रस्त्यांवर खड्डे | पुढारी

पिंपरी :  दुरुस्तीसाठी ‘पॅच’ लावल्याने रस्त्यांवर खड्डे

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र, रस्ते दुरूस्तीच्या ‘पॅच’मुळे खड्डे पडले असल्याचे सांगत ठेकेदारांवर कारवाईचा प्रश्न निर्माण होत नाही, असा दावा पालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे. पावसाचे पाणी साचून शहरातील बहुतांश रस्ते वाहून गेले. अनेक ठिकाणी खड्डे पडले. त्यातून वाहन नेताना चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. पालिका प्रशासनाकडे तसेच, जनसंवाद सभेत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त होत आहेत.

पालिकेच्या स्थापत्य विभागाने डांबर, खड्डी व राडारोडा टाकून शहरातील 80 टक्के खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. तर, रस्त्यावर खोदकाम केल्यानंतर दुरूस्तीसाठी पॅच लावण्यात येतो. ते पॅच पावसाच्या पाण्यामुळे निघून खड्डे पडले आहेत. सलग व मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले नाहीत, असा दावा पालिकेच्या स्थापत्य विभागाने केला आहे. त्यामुळे ठेकेदारांवर कारवाईचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे ते छातीठोकपणे सांगत आहेत. चुकीचे व हलक्या प्रतीचे काम करणार्‍या ठेकेदाराचे समर्थन करणार्‍या अधिकार्‍यांचा दावा ऐकून संताप व्यक्त केला जात आहे.

पालिकेने शहरातील 80 टक्के खड्डे बुजविले
शहरातील मुख्य रस्त्यांवर कोठेच खड्डे पडलेले नाहीत. ते रस्ते सुस्थितीत आहेत. ज्या ठिकाणी दुरूस्तीकाम करून पॅच लावण्यात आले, त्या ठिकाणीच खड्डे पडले आहेत. त्याबाबत ठेकेदाराला जबाबदार धरता येणार नाही. पालिकेने तातडीने दुरुस्तीकाम हाती घेऊन 80 टक्के खड्डे बुजविले आहेत, असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

Back to top button