पिंपरी : केंद्र सरकारच्या, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयातंर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (एनएसओ) 1 ऑगस्टपासून देशभरात घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षण (एचसीईएस) सुरू करण्यात येणार आहे. यासाठी बुधवारपासून प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. 29 ऑगस्टपर्यंत हे शिबिर चालणार आहे. हे शिबिर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (फील्ड ऑपरेशन्स डिव्हिजन) प्रादेशिक कार्यालयातर्फे (पुणे) आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या डेटा क्वालिटी अॅश्युरन्स विभागाचे (नागपूर) उपमहासंचालक जुनैद फारुकी यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्याच्या अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक हनुमंत माळी, तसेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे (पुणे) उपसंचालक श्रीनिवास शिर्के आदी याप्रसंगी उपस्थित होते. या सर्वेक्षणात वापरल्या जाणार्या तांत्रिक संकल्पनांवर चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी सुमारे 70 क्षेत्रीय अधिकारी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत आहेत. आरओचे उपसंचालक श्रीनिवास शिर्के, वरिष्ठ सहायक अधिकारी महेश चोरघडे आणि सूरजकुमार गुप्ता हे प्रशिक्षण देणार आहे. वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी गरिमा सिंग यांनी प्रास्ताविक केले. महादेव कुलाळ, आनंदसागर रोटे तसेच उच्च श्रेणी लिपीक ऐश्वर्य श्रीवास्तव यांनी संयोजनासाठी सहकार्य केले.