‘एनएचआय’पेक्षा महापालिका सुसाट; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे पिलर्स उभे | पुढारी

‘एनएचआय’पेक्षा महापालिका सुसाट; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे पिलर्स उभे

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) तुलनेत महापालिकेचे काम सुसाट असल्याचे दोन उड्डाणपुलांच्या कामावरून स्पष्ट झाले आहे. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दहा महिन्यांपूर्वी एकाच दिवशी भूमिपूजन झालेल्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, तर कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीने सुरू आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने राजाराम चौक ते फनटाईम थिएटर यादरम्यान उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे, कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) वंडरसिटी ते राजस सोसायटी चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू केले आहे.

या उड्डाणपुलामुळे देहूरोड बाह्यवळण रस्त्याने सोलापूरकडे ये-जा करणार्‍या जड वाहनांसोबत अन्य वाहनांचीही सोय होणार आहे. या उड्डाणपुलासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या जागेत पिलर उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन आणि कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन 24 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले आणि तत्कालीन पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले होते. भूमिपूजनानंतर सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुसाट सुरू आहे.

माणिकबाग ते हिंगणे चौकादरम्यान जवळपास सर्व पिलर्स उभे राहिले आहेत. आता पिलर्सवरील आडवे बीम आणि दोन पिलर्सला जोडणारे स्पॅन तयार करण्याचे काम सुरू आहे. माणिकबाग ते फनटाईम थिएटर आणि हिंगणे चौक ते विठ्ठलवाडी चौक यादरम्यानचे पिलर्स उभारण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे, एनएचआयकडून होत असलेल्या कात्रज चौकातील उड्ड्णपुलाचे काम मात्र धीम्या गतीने सुरू आहे. राजस सोसायटी चौकामध्ये आणि प्राणिसंग्रहालयालगत काही पिलर्सच्या फाउंडेशनचे काम सुरू आहे. कात्रज चौकातून पुलाखालून राजस सोसायटीकडे जाणारा रस्ता बॅरिकेड लावून बंद केला आहे. तसेच, कात्रज-नवले ब्रिज रस्त्यावर बॅरिकेडिंग करून माती परीक्षणाचे व पिलर्ससाठी खोदकाम सुरू आहे.

तांत्रिक कारणांमुळे आम्हाला कामाची वर्कऑर्डर उशिरा मिळाली. सध्या पाच पिलर्सचे काम सुरू आहे. आता सर्व अडचणी दूर झाल्याने वेगाने उड्डाणपुलाचे काम होईल.

                                         – धनंजय देशपांडे, वरिष्ठ अधिकारी, एनएचआय

Back to top button