पुणे : विनयभंग करणार्‍या सावत्र मामास कारावास | पुढारी

पुणे : विनयभंग करणार्‍या सावत्र मामास कारावास

पुणे; पुढारी वृत्तसेवा: घरात शिरून भाच्चीचा विनयभंग करणार्‍या 23 वर्षीय सावत्र मामास तीन वर्षांचा साधा कारावास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंदारे यांनी हा निकाल दिला. दंडाच्या रकमेतील तीन हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावे. आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त 15 दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे. 30 एप्रिल 2015 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास थेरगाव परिसरात ही घटना घडली.

घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश करत हाताला धरून ओढून घेत तिचा विनयभंग केला. तसेच, मनास लज्ज येईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात, सहाय्यक सरकारी वकील रेणुका देशपांडे- कर्जतकर यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. आरोपीने केलेला गुन्हा हा पूर्ण विचाराने व तयारीने केला आहे. त्याचा उद्देश हा पीडितेस मनात लज्जा उत्पन्न करण्याचा होता, हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. देशपांडे-कर्जतकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Back to top button