पुणे; पुढारी वृत्तसेवा: पोकेमॉन, डोरेमॉन, मोटू-पतलू ते छोटा भीम… असा बच्चेकंपनीसाठीच्या कार्टून्स राख्यांपासून ते कपल राखी, म्युझिकल राखी, स्टोन्स राखी अन् फॅमिली राखी सेटपर्यंतच्या राख्यांनी दुकाने सजली आहेत. रविवार पेठेतील बोहरी आळी असो वा लक्ष्मी रस्ता… तुळशीबाग असो वा फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता… रक्षबंधनाच्या निमित्ताने नानाविध प्रकारच्या राख्या बाजारात आल्या असून, यंदा राखी खरेदीला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. सर्वांत जास्त लहान मुलांसाठीच्या राख्यांची मागणी असून, राख्यांची किंमत 30 ते 40 टक्क्यांनी वाढली आहे. पर्यावरणपूरक सीड राखी, म्युझिकल राखी, स्टोन्स राखी, कपल राखी लक्ष वेधून घेत आहे.
रक्षाबंधनला अवघे काही दिवस उरले असून, राख्यांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. राख्यांपासून ते भेटवस्तूंच्या खरेदीवर लोकांचा भर आहे. भावा-बहिणीच्या नात्याला घट्ट बंधनात बांधणार्या वैविध्यपूर्ण राख्या सर्वांच्या पसंतीस उतरत आहेत. रविवार पेठेतील बोहरी आळीत होलसेल भावात राख्यांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. खास करून लहान मुलांच्या कार्टुन्स राखीसह फॅमिली राखी सेट आणि जरीच्या, स्टोन्सच्या, ब्रेसलेट प्रकारातील राखीला मागणी आहे. 10 रुपयांच्या पुढे राख्यांची किंमत आहे. लहान मुलांसाठी पोकेमॉन, सुपरमॅन, छोटा भीम राख्यांसह म्युझिकल आणि वेगवेगळ्या लाइटचा वापर असलेल्या राख्या आल्या आहेत. तर महिला-तरुणींचा भर देवी-देवतांच्या, कपल राखी आणि विविध रेशीम धाग्यांच्या राखीला मागणी आहे.
सीड राखी म्हणजेच भावाला राखी बांधल्यानंतर त्यात दिलेले बिजाचे झाड लावून वृक्षारोपण करा, असा संदेश देणार्या राखीलाही पसंती आहे. व्यावसायिक राकेश अगरवाल म्हणाले, 'कारागिरांनी तयार केलेल्या राख्या होलसेल भावात विकत आहोत. यंदा राख्यांना चांगली मागणी आहे. राख्यांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती आहे. राख्यांची किंमत 30 ते 40 टक्क्यांनी वाढली आहे. लहान मुलांच्या राख्यांची मागणी अधिक आहे. राजस्थान, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून कारागिरांनी तयार केलेल्या राख्या आल्या आहेत. काहीजण सहकुटुंब राख्यांच्या खरेदीसाठी येत आहेत. येत्या काही दिवसांत राख्यांची मागणी वाढेल.