अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरण्यास मुदतवाढ | पुढारी

अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरण्यास मुदतवाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज पूर्ण भरण्यासाठी 30 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पसंतीक्रम न भरलेल्या विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत पसंतीक्रम भरता येणार आहे. तर, कोटांतर्गत अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यानुसार कोटांतर्गत यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना शनिवारी 30 जुलैपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी 544 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 313 महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी 1 लाख 9 हजार 150 जागा उपलब्ध आहेत. त्यानुसार 65 हजार 106 विद्यार्थ्यांनी अर्जातील भाग दोन (गुण आणि महाविद्यालयांचे पर्याय) नोंदवले आहेत. कोटांतर्गत प्रवेशासाठी 24 हजार 259 जागा असून, त्यासाठी 9 हजार 468 विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशांतर्गत पसंतीक्रम नोंदवले आहे. यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार कोटांतर्गत प्रवेश जाहीर झाला. त्यानुसार पहिल्याच दिवशी 544 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

कोटांतर्गत प्रवेश घेण्यासाठीची अंतिम मुदत शनिवारी (दि.30) सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयांशी संपर्क साधून कागदपत्रे आणि शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगइन आयडीद्वारे दिसते. या यादीतील माहितीबाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप असल्यास, ते विद्यार्थ्यांना 30 जुलैला सायंकाळी 6 वाजेपर्यत नोंदवता येणार आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रवेश यादी 3 ऑगस्टला
सध्याच्या वेळापत्रकानुसार प्रवेश यादी 3 ऑगस्टला जाहीर झाल्यानंतर, यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करायची आहे, असे प्रवेश परीक्षा नियंत्रण समितीने सांगितले.

Back to top button