पुणे : अरे हे रस्ते आहेत, की मृत्यूचे सापळे; शहरातील अपघातांत रोज एक बळी | पुढारी

पुणे : अरे हे रस्ते आहेत, की मृत्यूचे सापळे; शहरातील अपघातांत रोज एक बळी

पुणे; पुढारी वृत्तसेवा:  हडपसर-फुरसुंगी रस्त्यावर सकाळच्या वेळी शाळेसाठी निघालेल्या बाप-लेकीवर नुकताच काळाने घाला घातला. कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. रस्त्याने चाललेल्या पादचार्‍यांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बेजबाबदार डंपरचालक, पीएमपीएल बस, पाण्याच्या टँकरचे चालक, कचरा वाहून नेणारे कंटेनर जणू आता काळच बनू पाहत आहेत. त्यामुळे ‘वाहन चालवताय? जरा सावधान!’ असेच म्हणण्याची सध्या वेळ आहे. चालू वर्षात जूनअखेर 165 नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला, तर एकूण 439 अपघात झाले.

त्यामुळे दिवसाला एका नागरिकाचा मृत्यू, तर दोन जण अपघातात जखमी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पुणे हे दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील वाहतूक कोंडीबरोबरच शहराची ओळख आता अपघातांचे शहर म्हणून होत आहे. शहरात 2018 ते जून 2022 अशा साडेचार वर्षांत तब्बल 3 हजार 452 अपघात झाले. या अपघातांमध्ये 1 हजार 22 नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये 1 हजार 652 गंभीर स्वरूपाचे अपघात होते. त्यामध्ये 1 हजार 938 नागरिक गंभीर जखमी झाले. इतर अपघातांत नागरिक किरकोळ जखमी झाले.

‘सर सलामत तो पगडी पचास’
शहरात 2020 मध्ये दुचाकीस्वारांच्या झालेल्या 143 अपघातांत 80 जणांचा मृत्यू झाला. अपघातांपैकी 72 जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आले आहे. तर, 2021 या वर्षात 255 दुचाकीस्वारांचे अपघात झाले. त्यातील 128 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 116 जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘सर सलामत तो पगडी पचास’ असेच म्हणावे लागत आहे.

दिवसेंदिवस शहरात वाहनांची संख्या वाढत असताना वारंवार अपघाताच्या घटना घडतात. बहुसंख्य अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे दुचाकीस्वारांना जिवाला मुकावे लागते. पुणेकरांनी आपल्या सुरक्षेसाठी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केला पाहिजे. नागरिकांनीदेखील वाहने चालविताना वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. दुचाकी चालविताना दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट घालून प्रवास केला पाहिजे. नवीन धोरणातही हे नमूद करण्यात आले आहे.
                                          – राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग.

9 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ब्लॅकस्पॉट
शहरातील 9 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 19 ब्लॅकस्पॉट 2021 मध्ये आढळले होते. त्यामध्ये हडपसर, शिवाजीनगर, वारजे, कोंढवा, येरवडा, मुंढवा, सिंहगड रोड, विमानतळ, भारती विद्यापीठ अशा पोलिस ठाण्यांच्या हद्दीचा समावेश आहे. त्यात आयबीएम कंपनी (हडपसर) येथे 10 अपघात झाले आहेत. संचेती चौक (शिवाजीनगर) 5, माई मंगेशकर हॉस्पिटल, डुक्कर खिंड, मुठा नदी पूल (वारजे) 30, खडीमशिन चौक (कोंढवा)6, संगमवाडी पार्किंग (येरवडा)8, मुंढवा रेल्वे ब्रिज 19, भूमकर चौक, नवले ब्रिज (सिंहगड रोड)43, टाटा गार्डरूम चौक, खराडी बायपास, रिलायन्स मार्ट, 509 चौक, विमाननगर चौक, खराडी जकात नाका (विमानतळ) 42, तर कात्रज चौक, नवीन कात्रज बोगदा, दरी पूल (भारती विद्यापीठ)33 अपघात झाले आहेत.

नियमभंग केल्याने अपघाताला निमंत्रण
वेगाची नशा, विनाहेल्मेट प्रवास, सिग्नल न पाळणे, नियमांचे पालन न करणे अशा विविध बाबी अपघाताचे कारण ठरून अनेकांच्या जिवावर बेतत आहेत. वाहतूक विभागाकडून वारंवार आवाहन करूनही सर्रास हेल्मेट न वापरताच प्रवास केला जात आहे. वाहतूक नियमन करताना पोलिस कर्मचार्‍यांकडे दुर्लक्ष करून नियमभंग करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत.

Back to top button