पुणे : मंकीपॉक्सचे 10 पैकी 8 नमुने निगेटिव्ह; आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण

पुणे : मंकीपॉक्सचे 10 पैकी 8 नमुने निगेटिव्ह; आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मंकी पॉक्ससदृश लक्षणे आढळून येणार्‍या संशयित रुग्णांची कसून तपासणी केली जात आहे. राज्यातून महिनाभरात 10 संशयित रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवण्यात आले होते. त्यातील आठ जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून, दोन नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचा एक रुग्ण सापडला, तरी ती महामारी असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या मंकी पॉक्स आजाराची लक्षणे आढळून येणार्‍या रुग्णांवर आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. महिनाभरापासून सर्वेक्षणावर भर देण्यात आला आहे. त्यातच दहा संशयित रुग्ण आढळून आले होते.

त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे तातडीने पाठवून संशयित रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले होते. त्यापैकी आठ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून, रोगी 2 ते 4 आठवड्यांत बरा होतो. तथापि, लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. आपल्या भागात एखाद्या रूग्णामध्ये मंकी पॉक्ससदृश लक्षणे आढळल्यास त्वरित विलगीकरण करून नजीकच्या आरोग्य केंद्राशी किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

संशयित रुग्णांचे नमुने महिनाभरातील आहेत. सर्वेक्षणातून संशयित रुग्ण आढळून आले. दहापैकी तीन जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. इतरांनी देशांतर्गत प्रवास केला आहे. संशयित रुग्णांचे कोणतेही तपशील जाहीर केले जाणार नाहीत.

                              – डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news