शेतात आढळला औषधसाठा, गार बेटवाडी येथील घटना | पुढारी

शेतात आढळला औषधसाठा, गार बेटवाडी येथील घटना

दौंड : पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरापासून पाच ते सहा किलोमीटर असलेल्या नवीन गार येथील शेतात रुग्णांना देण्यात येणारी मुदतबाह्य झालेली काही औषधे, तर काही मुदतीत असलेली औषधे फेकून दिलेली आढळून आली. हा प्रकार येथील ग्रामस्थ गणेश जगताप यांच्या निदर्शनास आला व त्यांनी लगेचच आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. परंतु ही औषधे कोणी आणून टाकली याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

तब्बल 5 ते 6 पोती हा औषधसाठा होता. मुदतबाह्य झाली तरी औषधी फेकून देता येत नाही. त्यामुळे जगताप यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. परंतु याबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती. यावरून दौंडमधील आरोग्य विभाग किती बेजबाबदार आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. ही बाब अत्यंत संवेदनशील असतानादेखील दौंडमधील आरोग्य अधिकारी मूग गिळून आहेत. याबाबत आरोग्य अधिकार्‍यांना विचारणा करण्याचा प्रयत्न असता त्यांनी याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला. दुपारनंतर काही आरोग्य अधिकारी घटनास्थळाची पाहणी करायला गेले. या प्रकरणात जे दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी गार बेटवाडी येथील ग्रामस्थांची आहे.

Back to top button