पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. 28) काढली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. हे आरक्षण ओबीसी आरक्षणासह होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या नवीन रचनेनुसार 82 गट झाले आहेत. त्यातील 50 टक्के म्हणजेच 41 गट हे खुला प्रवर्गासाठी असणार आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) 22 गट आरक्षित होणार आहेत.
अनुसूचित जातीसाठी आठ, तर जमातीसाठी सहा आरक्षण सोडत काढली जाणार आहे. दि. 28 जुलैला आरक्षण सोडत काढल्यानंतर, दुसर्या दिवशी म्हणजेच दि. 29 जुलैला नवीन आरक्षणाची प्रारूप अधिसूचना जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर 2 ऑगस्टपर्यंत आरक्षणावर हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी हे सुनावणी घेऊन निर्णय घेतील. जिल्हाधिकार्यांच्या निर्णयानंतर 5 ऑगस्ट रोजी नवे आरक्षण अंतिम केले जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.