पुणे : खंडणी उकळणार्या सराइतास अटक; माथाडी संघटनेचा अध्यक्ष असल्याचीं बतावणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: माथाडीच्या नावे लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून 30 हजार रुपयांची खंडणी उकळताना एकाला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अप्पर बिबवेवाडी रोडवरून रंगेहाथ पकडले. ओंकार रमेश हिंगे (वय 23, रा. शिवतेजनगर बिबवेवाडी) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा लातूर जिल्ह्यातील असून, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी धायरीगाव येथील 28 वर्षीय लेबर कॉन्ट्रॅक्टरने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास पथकाने ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिंगे याने फिर्यादींना स्वराज शिलेदार या माथाडी संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून, परिसरात लेबर कॉन्ट्रॅक्टरचे काम करायचे असेल तर महिन्याला 40 हजार रुपयांची मागणी केली होती. नाहीतर त्याच्याकडील माथाडी कामगार लावण्यास सांगितले होते. दरम्यान, याबाबत फिर्यादीने खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
कॉन्ट्रॅक्टरने दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी केली असता, हिंगे हा त्यांना मोबाईलवर फोन करून, त्यांच्या गाड्या अडवून जिवे मारण्याची धमकी देऊन माथाडीच्या नावे खंडणी मागत होता. तडजोडीअंती हिंगे याने कॉन्ट्रॅक्टरकडे 30 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने साध्या वेशात इनामदार चौक बिबवेवाडी येथील कॅफे काईमध्ये सापळा रचून 30 हजार रुपये घेताना हिंगे याला पंचाच्या समक्ष रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कामगिरी पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय गुरव, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, रवि सपकाळ यांच्या पथकाने केली.