पिंपरी : शहरातून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अकरा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी | पुढारी

पिंपरी : शहरातून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अकरा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 31 तारखेला होणार आहे. त्याची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. या परीक्षांसाठी 80 केंद्रांवर एकूण 11 हजार 355 विद्यार्थी बसणार आहे. यापूर्वी 20 तारखेला ही परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र, राज्यातील विविध जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीने परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता 31 तारखेला होणार्या परीक्षेसाठी 49 केंद्रांवर पाचवीचे 7 हजार 94 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे.

तर, 31 केंद्रांवर आठवीचे 4 हजार 261 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेच्या नियोजनसाठी 80 केंद्र संचालकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. 550 पर्यवेक्षक त्याचे कामकाज पाहणार आहेत. त्याशिवाय, 150 शिपाई त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 8 फिरते तपासणी पथक असणार आहे.

31 तारखेला सकाळी 11 ते दुपारी 12ः30 या वेळेत प्रथम भाषा व गणित यांची प्रश्नपत्रिका सोडवून घेतली जाणार आहे. तर, दुपारी 1ः30 ते 3 या वेळेत तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी ही परीक्षा होईल. एकूण 150 गुणाची एक प्रश्नपत्रिका असेल. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. आठवीच्या प्रश्नपत्रिकेत 15 प्रश्नांना दोन पर्याय निवडायचे आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून हा बदल झाला आहे. महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, पर्यवेक्षक अनिता जोशी, राजेंद्र कांगुडे, शिष्यवृत्ती परीक्षा समन्वयक सुभाष सूर्यवंशी यांनी या परीक्षांचे नियोजन केले आहे.

Back to top button