पुणे : दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी 17 नंबरचा फॉर्म भरा उद्यापासून | पुढारी

पुणे : दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी 17 नंबरचा फॉर्म भरा उद्यापासून

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक 17 (फॉर्म 17) भरून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 29 जुलै ते 24 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरता येईल. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज आणि शुल्क भरायचे असून, ऑफलाइन अर्ज आणि शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्जासोबत शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत (मूळ प्रत नसल्यास द्वितीय प्रत), प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड आणि छायाचित्र जोडणे, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल नमूद करणे बंधनकारक आहे. अर्ज भरल्यावर 1 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत मूळ अर्ज, ऑनलाइन शुल्क भरल्याच्या पोचपावतीच्या दोन छायाप्रती अर्जातील संपर्क केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयात जमा कराव्यात. तर संपर्क केंद्र आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी 30 ऑगस्टला अर्ज, शुल्काच्या पोचपावतीची एक प्रत, मूळ कागदपत्रे विभागीय मंडळाकडे जमा करायची आहेते. अधिक माहिती दहावीच्या विद्यार्थ्यांना http//:form17.mh-ssc.ac.in या लिंकवर, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना http//:form17.mh-hsc.ac.in या लिंकवर आहे

Back to top button