पिंपरी : ‘झीरो ड्रॉपआउट’मध्ये आढळली 155 शाळाबाह्य मुले | पुढारी

पिंपरी : ‘झीरो ड्रॉपआउट’मध्ये आढळली 155 शाळाबाह्य मुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने केलेल्या सुचनेनुसार महापालिका शिक्षण विभागाकडून शहरामध्ये ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ अभियान राबविण्यात आले. या अभियानात 155 शाळाबाह्य मुले शोधण्यात यश आले आहे. त्यांना शाळेत दाखल करुन घेण्यात आले आहे. मिशन झिरो ड्रॉपआऊट अभियानाला शहरात 5 तारखेपासून सुरुवात झाली.

20 तारखेपर्यंत अभियानासाठी मुदत देण्यात आली होती. या अभियानात 6 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. सर्वेक्षणात 74 मुले तर, 81 शाळाबाह्य मुली आढळल्या. कधीच शाळेत न गेलेली ही मुले आहेत. भोसरी, डुडूळगाव, मोशी, रावेत, वाकड-काळाखडक, पुनावळे, रावेत आदी परिसरात प्रामुख्याने हे अभियान राबविण्यात आले. शहरातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना या सर्वेक्षणात सहभागी करुन घेण्यात आले.

शाळा स्तरावर मुख्याध्यापकांकडून समिती स्थापन करुन हे सर्वेक्षण करण्यात आले. शहर हद्दीतून स्थलांतरित झालेल्या मुलांची आकडेवारी संकलित करणे, अन्य शहरातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या मुलांचे सर्वेक्षण करणे तसेच शाळामध्येच सोडणारी मुले, शाळेतच न गेलेली मुले यांचा शोध घेण्याचे काम या सर्वेक्षणात करण्यात आले. वस्त्या, इमारतींचे बांधकाम, वीटभट्ट्या, शहरातील विविध चौक, बसथांबे आदी ठिकाणी शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला.

 

‘मिशन झीरो ड्रॉपआउट’ अभियानात 155 शाळाबाह्य मुलांना शोधण्यात यश आले आहे. त्यांना शाळेत दाखल करुन घेतले आहे. शहरातील विविध भागांमध्ये शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला.
                                        – अनिता जोशी, पर्यवेक्षिका, महापालिका शिक्षण विभाग.

Back to top button