डेंग्युमुळे 604 जणांना ‘डंख’; पुणे शहरात रुग्ण वाढल्याने पालिकेच्या नोटिसा | पुढारी

डेंग्युमुळे 604 जणांना ‘डंख’; पुणे शहरात रुग्ण वाढल्याने पालिकेच्या नोटिसा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जुलै महिन्यात शहरात डेंग्यूचे 52 रुग्ण आढळून आले. डासांच्या उत्पत्ती ठिकाणांची महापालिकेकडून तपासणी करण्यात आल्यानंतर 604 आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर 68 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. नुकतेच एका खासगी रुग्णालयात एका ज्येष्ठ नागरिकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निवेदन राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.

महापालिकेकडून नियमित सर्वेक्षण व्हावे, उद्रेकग्रस्त ठिकाणी शीघ्र ताप सर्वेक्षण, हिवतापासाठी रक्ताचे नमुने गोळा करणे आणि त्याची तपासणी करणे, उद्रेकग्रस्त भागातील संशयित डेंग्यूच्या रुग्णांपैकी 5 टक्के रुग्णांचे रक्तजलनमुने सर्वेक्षण रुग्णालयामध्ये विषाणू परीक्षणासाठी पाठविणे, उद्रेकग्रस्त भागात धूरफवारणी, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करणे, आरोग्य शिक्षण आणि जनजागृती करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या रोगांनी शहरात थैमान घातले असून, डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोसायट्यांबरोबरच घरातही फुलदाणी, फ्रिजच्या मागील ट्रे, कुंड्या यातून व तसेच रुग्णालये, निर्माणाधीन बांधकामे, सरकारी कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंग्यूचे डास आढळले आहेत. या सर्वांना नोटीस बजावण्यात येत आहेत.

शहरात 1 जानेवारी ते 25 जुलै या दरम्यान डेंग्यूचे निश्चित निदान झालेल्या 195 रुग्णांची नोंद महापालिकेत झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण जुलैमध्ये आढळले आहेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महापालिका डासांचे उत्पत्ती ठिकाण आढळणार्‍या आस्थापनांना सुरुवातीला नोटीस देते. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. इतके करूनही डासांची पैदास सुरू राहिल्यास संबंधितांविरोधात न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे.

                   – डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

Back to top button