खडकीत 40 दुचाकी बुडाल्या; काही दुकानांतही शिरले पाणी | पुढारी

खडकीत 40 दुचाकी बुडाल्या; काही दुकानांतही शिरले पाणी

खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडली. कॉसमॉस बँकेच्या पाठीमागे साचलेल्या पाण्यात 40 ते 45 दुचाकी बुडाल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणी साठल्याने बोर्डाच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. परिसरामध्ये सायंकाळी चारच्या सुमारास प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू झाला. अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण परिसर जलमय झाला होता. सुमारे दोन तास पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. खडकी बिझनेस सेंटरच्या तळमजल्यामध्ये पाणी शिरल्याने तेथील दुकानदाराची तारांबळ उडाली. तसेच काही दुकानात पाणीही शिरले.

खडकी-डेपोलाइन येथील सखल भागात पाणी साठले होते, तर कर्नल भगत हायस्कूलच्या पटांगणात साचलेल्या पाण्यातून दुचाकी काढताना शिक्षकांची तारांबळ उडाली. बसस्थानक व नवीन होळकर पुलाच्या परिसरात पाणी साचल्याने नागरिक व वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. कॉसमॉस बँकेच्या पाठीमागे पाणी साठल्याने तेथील सुमारे 40 ते 45 दुचाकी बुडाल्या आहेत. दुचाकी वाहने पाण्यात बुडाल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली होती. पावसामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे बोर्डाचे आरोग्य अधीक्षक शिरीष पत्की यांनी सांगितले.

खडकवासला परिसरात जोरदार पाऊस
काही दिवसांच्या उघडिपीनंतर बुधवारी खडकवासला, किरकटवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला. दुपारपर्यंत खडकवासला येथे 30 मिलिमीटर पावसाची नोंदी झाली. किरकटवाडी फाटा, कोल्हेवाडी, खडकवासला आदी ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सिंहगड, डोणजे, खानापूर भागातही जोरदार सरी कोसळल्या. मात्र, तुरळक पावसाचा अपवाद वगळता वरसगाव, टेमघर व पानशेत धरण परिसरात दिवसभर उघडीप होती. खडकवासला धरण साखळीत सायंकाळी पाच वाजता 21.37 टीएमसी (73.32 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता.

Back to top button