पुणे : ‘पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य | पुढारी

पुणे : ‘पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकर्‍यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आता आधारशी जोडणे आवश्यक आहे. ‘केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बँक खाते आधार क्रमांकाला न जोडल्यास आणि लाभार्थ्यांचे ई-केवायसी न केल्यास यापुढील लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना सहजरीत्या ई-केवायसी करता यावी, यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. पीएम किसान योजनेच्या आढाव्याबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. आत्तापर्यंत 5 लाख 14 हजार 246 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 896 कोटी 35 लक्ष रुपये जमा करण्यात आले आहेत. पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, याबाबत दक्षता घ्यावी. कृषिमित्रांनी संकलित केलेल्या माहितीला महसूल अधिकार्‍यांनी प्रमाणित करावे. जिल्ह्यातील 2 लाख 62 हजार 963 शेतकर्‍यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण आणि 1 लाख 14 हजार 516 लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची आधार जोडणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. बँकांनी देखील या कामासाठी आवश्यक सहकार्य करावे.’

‘गावनिहाय लाभार्थ्यांच्या याद्या महा-ई-सेवा केंद्र आणि सामान्य सेवा केंद्रांना देण्यात आल्या आहेत. कृषिसेवक, ग्रामसेवक आणि महसूल अधिकार्‍यांनी दिलेल्या गावांसाठी नियोजन करून कालमर्यादेत काम पूर्ण करावे. स्वयंनोंदणी केलेल्या 1 लाख 35 हजार 729 शेतकर्‍यांच्या माहितीची त्वरित तपासणी करण्यात यावी,’ असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. ‘ई-केवायसी व आधार जोडणी वेळेत न झाल्यास पात्र शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी यासाठी यंत्रणांना सहकार्य करावे. शेतकर्‍यांनी जवळच्या महा-ई-सेवा किंवा सीएससी केंद्रात जाऊन नोंदणी पूर्ण करावी,’ असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.

तालुका         एकूण लाभार्थी       ई-केवायसी शिल्लक
आंबेगाव            36,255                    18,068
बारामती            57,812                    27,277
भोर                  25,948                     11,251
दौंड                  50,355                    25,255
हवेली                17,606                    12,951
इंदापूर               54,993                   31,529
जुन्नर                 59,754                    29,567
खेड                   52,751                   28,399
मावळ               20,836                    12,266
मुळशी              22,109                    15,804
पुरंदर               32,529                     18,875
शिरूर              56,729                     28,311
वेल्हा               10,502                        6,009

Back to top button