‘ईडी’च्या माध्यमातून दबाव, काँग्रेसचा आरोप; पुण्यात आंदोलन | पुढारी

‘ईडी’च्या माध्यमातून दबाव, काँग्रेसचा आरोप; पुण्यात आंदोलन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘महागाई, बेरोजगारीसारख्या सामान्य माणसांच्या प्रश्नांवर काँग्रेस प्रश्न विचारत आहे. संसदेत व संसदेबाहेर काँग्रेस पक्ष भाजप सरकारला जाब विचारत आहे. त्यामुळे ईडीच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे,’ असा आरोप पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीच्या चौकशीसाठी सातत्याने बोलाविले जात आहे. याविरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले, त्या वेळी शिंदे बोलत होते.

‘देशात तिरस्काराचे राजकारण केले जात असून, त्यांच्यात महागाईच्या राक्षसाचा शिरकाव झाला आहे. म्हणूनच ते देशसेवा करण्याऐवजी दोन उद्योगपती मित्रांच्या सेवेत मग्न आहेत,’ अशी टीकाही त्यांनी केली. या वेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे, अ‍ॅड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, संजय बालगुडे, आबा बागूल यांनी मनोगत व्यक्त केले. सत्याग्रहात मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

खडकी येथे रेल रोको
मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.27) खडकी रेल्वे स्टेशन येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पुणे-लोणावळा लोकल रोखत केंद्र सरकारचा व ईडीचा निषेध केला. या आंदोलनात राष्ट्रीय सरचिटणीस मितेंद्र सिंग, प्रतिमा मुदगल, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन व अन्य उपस्थित होते.

Back to top button