काविळीचा परिणाम थेट यकृतावर; ‘फॅटी लिव्हर’ची समस्या उद्भवणार्‍यांचे प्रमाण वाढले | पुढारी

काविळीचा परिणाम थेट यकृतावर; ‘फॅटी लिव्हर’ची समस्या उद्भवणार्‍यांचे प्रमाण वाढले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दरवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात काविळीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दूषित अन्न, पाणी, दूषित रक्तातून किंवा असुरक्षित लैंगिक संबंधांतून काविळीच्या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता असते. बरेचदा काविळीचा थेट यकृतावर परिणाम होतो. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत फॅटी लिव्हरची समस्या उद्भवणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे.

जागतिक हिपॅटायटिस दिवस
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात सुमारे 4 कोटी लोकांना ‘हिपॅटायटिस बी’चा दीर्घकाळ संसर्ग झालेला असतो. 60 लाख ते 1.2 कोटी लोकांना ‘हिपॅटायटिस सी’चा दीर्घकाळ संसर्ग होतो आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, भारतात सुमारे अडीच लाख लोक या विषाणूमुळे मरण पावले आहेत. ‘हिपॅटायटिस ए आणि ई हा पाण्यातून होणारा संसर्ग आहे. हिपॅटायटिस बी आणि सी संक्रमित व्यक्तीच्या रक्त किंवा शरीरातील द्रव पदार्थाच्या संपर्काद्वारे पसरतो. दूषित पाण्यामुळे पसरणार्‍या हिपॅटायटिस ई मुळे भारतात बर्‍याच प्रमाणात उद्रेक झाला आहे. गर्भावस्थेत हिपॅटायटिस गंभीर होऊ शकतो आणि यामुळे यकृतही निष्क्रिय होऊ शकते. ए आणि ई विषाणूमुळे झालेल्या हिपॅटायटिसवर विषाणूविरोधी उपचार उपलब्ध आहेत,’ अशी माहिती डॉ. संतोष साबळे यांनी दिली.

दोन महिन्यांतच आढळतात जास्त रुग्ण
जुलै आणि ऑगस्टमध्ये काविळीच्या रुग्णांमध्ये दर वर्षी वाढ होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 2020 मध्ये जुलै महिन्यात काविळीचे 17, तर ऑगस्ट महिन्यात 20 रुग्णांची नोंद झाली होती. 2021 मध्ये जुलै महिन्यात 9, ऑगस्ट महिन्यात 14 रुग्णांची नोंद झाली. इतर महिन्यांच्या तुलनेत या दोन्ही महिन्यात जास्त रुग्ण आढळून आले.

सायलेंट किलरमुळे लवकर लक्षणे दिसत नाहीत
पाचही प्रकारच्या हिपॅटायटिस विषाणूंसोबतच फॅटी लिव्हर डिसीज (एएफएलडी) या दोन्ही प्रकारातील रुग्णांची वाढ झाली आहे. यकृताचा आजार हा देशात जीवनशैलीचा आजार बनला आहे आणि दररोज यकृत विकाराची अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. फॅटी लिव्हरचा आजार जास्त प्रमाणात चरबी साठल्यामुळे होतो. हा सायलेंट किलर असल्यामुळे यकृत खराब होईपर्यंत लक्षणे दिसत नाहीत. लठ्ठ व्यक्ती, मधुमेह आणि उच्च रक्तदाब, हृदयविकार, कोलेस्टेरॉलच्या समस्या, थायरॉईड आणि स्लीप एपनिया असलेल्या रुग्णांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून येते. गंभीर प्रकरणांमध्ये यकृत निकामी होते.

व्हायरल हिपॅटायटिस
वर्ष रुग्ण
2020 175
2021 144
2022 59
(जाने.-जून)

लठ्ठपणाच्या मोठ्या प्रमाणामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजमध्ये वाढ झाली आहे. यकृत पॅनेल नावाने ओळखल्या जाणार्‍या चाचण्यांमध्ये यकृताद्वारे बनवलेल्या विविध एन्झाईम्स, प्रथिने आणि इतर पदार्थांचे मोजमाप केले जाते. वजन कमी करणे, नियमित व्यायाम करणे, ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे, जंक फुड, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थ खाणे टाळणे, धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन, शर्करायुक्त पेयाचे सेवन टाळणे आवश्यक आहे.

डॉ. निरंजन नायक, वैद्यकतज्ज्ञ

 

Back to top button