पुणे : शेतकर्‍याची सोन्याची चेन अडतदाराकडून परत | पुढारी

पुणे : शेतकर्‍याची सोन्याची चेन अडतदाराकडून परत

मंचर, पुढारी वृत्तसेवा : मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकर्‍याची 75 हजार रुपये किंमतीची दीड तोळ्याची चेन मार्केटमधील भाजीपाला अडतदार धनेश निघोट यांना सापडली. त्यांनी ती प्रामाणिकपणे परत केली असून, त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

कळंब (ता. आंबेगाव) येथील शेतकरी तुषार विनायक भालेराव हे आपला फ्लॉवर घेऊन मंचर मार्केटमध्ये आले होते. माल उतरवून ते घरी आले असता त्यांना चेन गहाळ झाल्याचे समजले. याबाबत त्यांनी मार्केट यार्डला फोन केला असता चेन सुरक्षित असल्याचे समजले. त्यांच्या गळ्यातील चेन मार्केटमधील भाजीपाला अडतदार धनेश निघोट यांना सापडली होती. याबाबत मंचर बाजार समितीचे सेवक भैया शेख यांनी ध्वनिक्षेपकावरून त्यांना ही माहिती दिली होती.

त्यानंतर तुषार भालेराव हे दुसर्‍या दिवशी दुपारी मार्केटमध्ये आले असता खातरजमा करून त्यांना त्यांची चेन देण्यात आली. तुषार भालेराव यांनी स्वखुशीने मार्केट यार्डमधील दत्त मंदिरासाठी चार हजार रुपयाची देणगी दिली. धनेश निघोट यांना सापडलेली चेन प्रामाणिकपणे परत केल्याने भालेराव यांनी त्यांचे आभार मानले. मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी प्रामाणिकतेबद्दल धनेश निघोट यांचे अभिनंदन केले.

Back to top button