पुणे : सोरतापवाडी ग्रामपंचायतीला स्मार्ट व्हिलेज पुरस्कार | पुढारी

पुणे : सोरतापवाडी ग्रामपंचायतीला स्मार्ट व्हिलेज पुरस्कार

उरुळी कांचन, पुढारी वृत्तसेवा : ग्रामविकासात वैविध्यपूर्ण कामगिरी करणार्‍या हवेली तालुक्यातील सोरतापवाडी ग्रामपंचायतीला सन 2021 -22 या वषार्साठीचा पुणे जिल्हा परिषदेचा आर. आर. पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार मिळाला.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी आर. आर. पाटील स्मार्ट व्हिलेज योजनेनुसार ग्रामविकासात अग्रगण्य ठरणार्‍या ग्रामपंचायतीला या पुरस्काराने सन्मानितकरण्यात येते. सोरतापवाडी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शौचालय निर्मिती, घनकचरा, सांडपाणी निर्मूलन, वृक्षारोपण, संवर्धन, करवसुली, सुविधा या सर्व आघाड्यांवर चांगले काम केले. पर्यावरण, आरोग्याच्या दृष्टीने ठळक कामे केली.

हवेली तालुक्यात पुणे – सोलापूर महामार्गलगत असणार्‍या गावाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा नियोजन मंडळ, जिल्हा परिषदेच्या विविध योजना, मुद्रांक निधी, खासदार व आमदार फंडातून गावचा विकास साधण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकवर्गणी व शासकीय निधीतून समाज मंदिरांचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे मोठे कार्य हाती घेतले आहे. स्वच्छता अभियान राबवून ग्रामस्थांनी स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण केली आहे. या ग्रामपंचायतीला यापूर्वी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

‘जिल्हा परिषदेच्या स्मार्ट व्हिलेज पुरस्कासाठी गावचीनिवड होणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. विकासामध्ये ग्रामस्थांनी दिलेले सहकार्य, शासकीय पातळीवर मिळालेला निधी, लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीने दिलेले पाठबळ यामुळे हा पुरस्कार मिळाला, असे
सरपंच संध्या अमित चौधरी व उपसरपंच शंकर कड यांनी सांगितले. सामूहिक जबाबदारीतून उत्कृष्ट कार्य घडते या ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे. याचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा, असे स्वच्छता दूत डॉ. गोपाळ हूड यांनी सांगितले.

Back to top button