मधमाशी पालनासाठी ‘स्मार्ट हनिकोंब मॉनिटरिंग डिव्हाइस’ | पुढारी

मधमाशी पालनासाठी ‘स्मार्ट हनिकोंब मॉनिटरिंग डिव्हाइस’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागात कार्यरत असणारे प्राध्यापक डॉ. राधाकृष्ण पंडित यांच्यासह त्यांचे सहकारी प्राध्यापक डॉ.विक्रम काकुळते आणि डॉ. बाळासाहेब टपले या तिघांनी मधमाशी पालन या विषयात संशोधन करत ‘स्मार्ट हनिकोंब मॉनिटरिंग डिव्हाइस’ बनविले आहे. भारत सरकारने यासाठी त्यांना नुकताच स्वामित्व हक्क (पेटंट) जाहीर केले आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी डॉ. पंडित यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. पंडित म्हणाले, मधमाशी पालन करताना त्याचे मॉनिटरिंग अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होणार आहे. यासाठी यामध्ये कॅमेरे लावण्यात आले आहेत. मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाश्यांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळेच मधमाश्यांचे संगोपन हे पेट्यांमध्ये करून त्याद्वारे शास्त्रीय पद्धतीने मध गोळा करणे योग्य मानले जाते. मधमाश्या या परागीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

आम्ही तयार केलेल्या या उपकरणामध्ये कॅमेरे बसविले असल्याने मधमाश्यांचे सूक्ष्म निरीक्षण करणे शक्य होईल. मधमाश्यांचे शत्र्ाूंपासून रक्षण करत त्यांची संख्या वाढविण्याचा दृष्टीने हे उपकरण महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचेही डॉ.पंडित यांनी सांगितले. डॉ.पंडित यांना एकूण 29 वर्षांचा अध्यापनाचा व संशोधनाचा अनुभव आहे. त्यांनी बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला असून, त्यांचा याबाबत शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

डॉ. पंडित यांच्यासोबत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विक्रम काकुळते व राजूर महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.बाळासाहेब टपले यांनी हे उपकरण तयार केले असून, या तिघांनाही हे पेटंट जाहीर झाले आहे.

Back to top button