सिंहगड पायथा रस्त्याची चाळण पर्यटकांसह नागरिकांची गैरसोय | पुढारी

सिंहगड पायथा रस्त्याची चाळण पर्यटकांसह नागरिकांची गैरसोय

 खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्याच्या शिवकालीन पायी मार्गापेक्षा गड पायथ्याच्या गोळेवाडी ते आतकरवाडी रस्त्याचा प्रवास खडतर बनला आहे. आतकरवाडी रस्त्याची खड्डे पडून अक्षरश: चाळण झाली आहे. पावसाचे पाणी साठून खड्डे पडले आहेत. त्यामुळे हजारो पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांना हलाखीला तोंड द्यावे लागत आहे. खड्ड्यात वाहने घसरून अपघात होतात. असे असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

गडावर जाणार्‍या शिवकालीन पायी मार्गाने रिमझिम पावसात ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले सहज चढाई करत आहेत. मात्र, डोणजे येथील गोळेवाडी चौक ते आतकरवाडी रस्त्यावरुन सिंहगडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी मोठ्या खडतर प्रवासाला तोंड द्यावे लागत आहे. अतिवृष्टीच्या पुरात लक्ष्मीआई ओढ्याच्या पुराच्या पाण्यात पुलासह रस्ता बुडाला होता. त्यामुळे काही काळ शेकडो पर्यटक अडकून पडले होते. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पावसाचे पाणी साठून पुन्हा मोठे खड्डे पडले आहेत.

शनिवार, रविवार तसेच इतर दिवशीही सिंहगडावर पायी जाण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक, गिर्यारोहक येत आहेत. गडावर जाणारा जवळचा मार्ग असल्याने बहुतांश पर्यटक पीएमपी बस तसेच खासगी वाहनाने गोळेवाडी ते आतकरवाडी रस्त्याने गडाच्या पायथ्याशी येतात. अलीकडच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक दुपटीने वाढली आहे. पावसाळी हंगामात सर्वांत जास्त पर्यटकांची वर्दळ असते.

खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले आहे. पूर निधीतून रस्त्याचे काम करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-नवनाथ पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य

 

पावसाळ्यापूर्वी आतकरवाडी रस्त्याची दुरुस्ती करण्याची विनंती करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता पावसामुळे खड्डे पडून आता या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेेमुळे स्थानिक, नागरिक व पायी जाणार्‍या पटर्यटकांची गैरसोय होत आहे
-गुलाबराव जेधेे, माजी सरपंच

Back to top button