आओ… जाओ… घर तुम्हारा! येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील चित्र | पुढारी

आओ... जाओ... घर तुम्हारा! येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील चित्र

येरवडा : पुढारी वृत्तसेवा: येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचा कारभार ‘आओ… जाओ… घर तुम्हारा’ अशाप्रकारे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कार्यालयात सहायक आयुक्त व डेप्युटी कमिशनर पूर्ण वेळ कार्यरत नसल्याने कनिष्ठ अभियंत्यांपासून ते शिपाईवर्गापर्यंत सर्व जण ‘कोणी कितीही वाजता या, कितीही वाजता जा’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिक विविध कामांनिमित्त कार्यालयात येत आहेत. मात्र, कार्यालयात अंतर्गत कामे मार्गी लागत नसल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. त्यामुळे दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी पूर्ण वेळ अधिकारी नेमावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तीन प्रभाग येतात. या तीन प्रभागांत नागरी समस्या प्रचंड आहेत. याशिवाय कार्यालयीन कामकाजासाठी जन्म-मृत्यू नोंद, विवाह नोंदणी, आरोग्य विभाग, नागर वस्ती विभाग, गवनी, अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह विभाग आदी विभागांकडे कामकाजानिमित्त कार्यालयात येणार्‍या नागरिकांची संख्या अधिक आहे. या कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त वैभव कडलक, उपअभियंता बहिरम यांच्याकडे अन्य विभागांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते देखील फारसे कार्यालयात उपस्थित नसतात. याचाच फायदा घेत कार्यालयातील इतर कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात. अधिकार्‍यांना फोन केला, तर फोन घेत नाहीत. त्यामुळे नागरी समस्या सांगायच्या कुणाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर पूर्ण वेळ अधिकारी द्यावेत, अशी मागणी होत आहे.

मोहल्ला कमिटीच्या बैठका दरमहा होणे बंधनकारक आहे. कोरोना काळापासून बंद झालेल्या बैठका अद्याप सुरूच झाल्या नाहीत. इतर कार्यालयांत मात्र दरमहा मोहल्ला कमिटी बैठक होत असताना येरवडा क्षेत्रीय कार्यालयात बैठका होत नाहीत. पूर्ण वेळ अधिकारी मिळावेत, यासाठी महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे. मोहल्ला कमिटी बैठका होण्यासाठी, तसेच अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात वेळेत हजर राहण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात येईल.
                                                                – संजय गावडे, उपआयुक्त

Back to top button