आरती कुणाच्याही विरोधात नाही, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांचे स्पष्टीकरण | पुढारी

आरती कुणाच्याही विरोधात नाही, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांचे स्पष्टीकरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य मी ऐकलं होतं, देवळात येताना राजकारणाचे जोडे बाहेर ठेवायचे असतात. त्यामुळे आम्ही कोणाच्याही विरोधात आरती केली नाही,’ असे शिवसेनेच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या एक ऑगस्टला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती करणार आहेत. त्यापूर्वी शिवसेनेने आरती केल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. गोर्‍हे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘आम्ही अगोदर महाआरती केली असं म्हणणे चुकीचे आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारी (दि.27) वाढदिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही आरती केली, त्यात गैर काय आहे. राजकारणातले मतभेद आम्ही देवाच्या दारी आणत नाही. आमच्या मनात राजकीय डावपेच नाहीत.’ उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर शिवसेनेच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज महाआरती करण्यात आली. या वेळी श्री गणेशाला 62 किलोंचा मोदक डॉ. गोर्‍हे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. शहरप्रमुख संजय मोरे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, राजेंद्र शिंदे, शिवसहकार सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब भांडे यांनी गणरायाला अभिषेक केला.

डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, ‘शिवसेना शिवसैनिकांच्या भावनांवर आणि विचारांवर चालत असलेला पक्ष आहे. अनेकवेळा लोकांनी पक्षातून बाहेर जाण्याचा प्रसंग आला. मात्र, भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही आणि आपले काम सातत्याने पुढे चालू ठेवायचे, या तत्त्वानुसार शिवसेनेने आपले काम पुढे सुरू ठेवले आहे.’

खोतकरांनी ठाकरेंशी बोलावे
जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्याबद्दल बोलताना डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, ‘खोतकर यांना ईडीबद्दल काही भीती वाटत असेल, तर त्यांनी त्यांची बाजू उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडावी, जेणेकरून त्यावर काही मार्ग काढता येऊ शकेल.’

Back to top button