सव्वा कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, नायजेरियन दाम्पत्यास अटक | पुढारी

सव्वा कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, नायजेरियन दाम्पत्यास अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कपडे, बुटांचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने व्यावसायिक व्हिसावर भारतात आल्यानंतर, अमली पदार्थांची विक्री करणार्‍या एका नायजेरियन दाम्पत्यास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. हे दाम्पत्य शहरातील उच्चभ्रू परिसरात अमली पदार्थांची विक्री करत होते. उगुचुकु इम्यॅनुअल (43), ऐनीबेली ओमामा व्हिवान (30, सध्या राहणार दोघे. नालंदा गार्डन रेसीडेन्सी, बाणेर, मूळ. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 96 लाख 60 हजार रुपयांचे 644 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी), 30 लाख 16 हजार 800 रुपयांचे 120 मिलीग्रॅम कोकेन, 2 लाख 16 हजार रुपयांचे मोबाईल, इलेक्ट्रिक वजनकाटा, प्लास्टिक पिशव्या असा तब्बल 1 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जाणकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उगुचुकु आणि ऐनीबेली हे पती – पत्नी असून, मूळचे नायजेरियाचे रहिवासी आहेत. दोघेही बूट आणि कपड्यांचा व्यवसाय करण्यासाठी भारतात आले. प्रथम उगुचुकु हा भारतात आला. त्याच्यावर 2018 मध्ये अमली पदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो येथेच आहे. त्याची पत्नी नंतर भारतात आली. दोघांकडून बाणेर भागात राहत्या घरातून एमडी पावडर, कोकेन अशा अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

यानुसार सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जाणकर, कर्मचारी राहुल जोशी, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने बाणेर भागात सापळा रचून उगुचुकु आणि ऐनीबेली यांना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले.

Back to top button