पुणे : प्रतिनिधी :श्रावण महिना सुरू होण्यास दोन दिवस राहिल्याने आखाडाच्या शेवटच्या टप्प्यात चिकन-मटण आणि मासळीवर यथेच्छ ताव मारण्याचा उत्साह मंगळवारी (दि. 25) पुणेकरांमध्ये दिसून आला. शहराच्या विविध भागांत सकाळपासूनच दुकानांमध्ये मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. सणांचा महिना असलेल्या श्रावणात बहुतांश लोक मांसाहार वर्ज्य करतात. आखाड महिन्याची सांगता गुरुवारी (दि.28) होत असून मांसाहारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने अनेकांनी घरी चिकन-मटणाचे बेत आखले होते.
शहरातील कसबा पेठ, भवानी पेठ, फर्ग्युसन रस्ता, कर्वे रस्ता तसेच लष्कर भागातील मटण मार्केट व अन्य भागातील चिकन दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गणेश पेठेतील मासळी बाजारात मंगळवारी खोल समुद्रातील जवळपास 12 ते 14 टन, आंध— प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची 15 ते 20 टन दाखल झाला.
मासे, चिकन कापून देणार्यांना आला भाव
मासळी खरेदी केल्यानंतर ते कापून तसेच स्वच्छ करून देणार्यांकडेही नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. यामध्ये घरगुती ग्राहकांचे प्रमाण मोठे होते. एका किलोला 20 रुपये दर आकारून मासळी स्वच्छ करून तसेच कापून देण्याचे काम अनेक जण करीत होते. तर, आखाडात घरगुती कार्यक्रमासांठी गावठी कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी राहिली. धार्मिक कार्यक्रमांच्या स्थळी कोंबडा कापून त्याचे तुकडे करून देण्यासाठी चिकन विक्रेत्यांकडून 50 रुपये दर आकारण्यात येत होता.
मांसाहारी हॉटेलबाहेर खवय्यांच्या रांगा
शहरातील हॉटेलमध्ये खवय्यांची चिकन, मटण, मासळीच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी मोठी गर्दी झाली होती. मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी तसेच पार्सल नेण्यासाठी शहरातील हॉटेल व दुकानांबाहेर अनेकांनी चक्क रांगा लावल्या होत्या. तर, काहींनी ऑनलाइन ऑर्डर बुक करून आखाड पार्टी घरीच साजरी करण्यास प्राधान्य दिल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.