पुणे : जबरी चोर्‍यांचे आव्हान! रस्तोरस्ती धुडगूस: पोलिस हतबल! रोखणार कोण? | पुढारी

पुणे : जबरी चोर्‍यांचे आव्हान! रस्तोरस्ती धुडगूस: पोलिस हतबल! रोखणार कोण?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रस्तोरस्ती जबरी चोरी करणार्‍या चोरट्यांची शहरात दहशत आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी तर अक्षरशः धुडगूस घातला आहे. पादचारी असो की दुचाकीवरून निघालेल्या महिला, काही समजण्याच्या आत चोरटे गळ्यातील ऐवज, हातातील मोबाईल हिसकावत आहेत. जबरी चोरी करणार्‍या चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान आहे. त्यांना वेसण घालणार तरी कोण? असा सवाल नागरिक विचारत आहेत. एकाच दिवशी शहरातील विविध भागांत जबरी चोरीच्या तीन घटना घडल्या असून, एकूण चार जबरी चोर्‍या समोर आल्या आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांकडील मोबाइल संच हिसकावणार्‍या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शहरात दररोज मोबाईल हिसकावण्याच्या किमान दोन ते तीन घटना घडतात.

शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर मोटारीत असलेल्या महिलेचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला मूळच्या नवी मुंबईतील आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी त्या पुण्यात आल्या. शिवाजीनगर न्यायालयातील प्रवेशद्वार क्रमांक तीनसमोर त्या मोटारीत बसल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटे मोटारीजवळ आले आणि महिलेच्या हातातील 15 हजारांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. त्यांनी आरडा-ओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत चोरटे पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक प्रताप साळवे तपास करीत आहेत.

सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतर प्रभात रस्त्यावरून चालत निघालेल्या एका ज्येष्ठ महिलेचा ऐवज चोरट्यांनी हिसकावला. याप्रकरणी पौड रोड येथील 65 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी घडली. फिर्यादी या रस्त्याने चालत निघाल्या होत्या. त्या वेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या हातातील मोबाईल, कापडी पिशवी, छत्री व पाकीट असा 10 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरी केला.

महिलेकडील ऐवज जबरदस्तीने हिसकावणार्‍या दोघा चोरट्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. कुबेर कहर विश्वकर्मा (वय 26), मिलन प्रेम सुनार (वय 21, राहणार नेपाळ) अशी दोघांची नावे आहेत. संपत खिंवसरा (वय 53, रा. दर्शमी चौक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास संदेशनगर सोसायटी मार्केट यार्ड परिसरात घडली. फिर्यादींची पत्नी व मुलगी रविवारी रात्रीच्या वेळी संदेशनगर सोसायटी मार्केट यार्ड परिसरातून रस्त्याने चालत निघाल्या होत्या. त्या वेळी आरोपी कुबेर हा दुचाकीवरून तेथे आला. त्याने फिर्यादींच्या पत्नीच्या हातातली पाचशे रुपयांची नोट व गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. तर, मिलन हा दुचाकीवून आरोपी कुबेर याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला होता. दरम्यान, फिर्यादींच्या मुलीने प्रसंगावधान राखत आरडा-ओरडा केला. त्या वेळी परिसरातील नागरिकांनी मिलन यालादेखील पकडले.

मार्केटनगर, संदेशनगर येथील गणेश मंदिरात
दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या खांद्याला अडकविलेली पर्स चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी 49 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्केट यार्ड पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास संदेशनगर परिसरात घडली. फिर्यादी महिला या त्यांच्या बहिणीसोबत गणपती दर्शनासाठी मंदिरात रस्त्याने चालत निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या खांद्याला अडकविलेली पर्स हिसकावली. पर्समध्ये 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल होता.

Back to top button