पुणे : आता शेतसारा ‘ऑनलाइन’ भूमिअभिलेख विभागाची तयारी सुरू | पुढारी

पुणे : आता शेतसारा ‘ऑनलाइन’ भूमिअभिलेख विभागाची तयारी सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या धर्तीवरच आता जमीनविषयक महसूल कर अर्थात शेतसारासुध्दा ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी भूमिअभिलेख विभागाने सुरू केली आहे. या ऑनलाइन सुविधेमुळे शेती कर, बिनशेती कर, शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, ग्रामपंचायत उपकर, जिल्हा परिषद उपकर आदी प्रकारचे कर घरबसल्या भरता येणार आहे. भूमिअभिलेख विभागाने संगणक प्रणाली विकसित केली असून, राज्यात प्रायोगिक तत्त्वावर पाच गावांमध्ये या सुविधेचा वापर केला जात आहे. यामध्ये येणार्‍या तांत्रिक समस्येवर उपाययोजना करून येत्या काही महिन्यांत राज्यभरात शेतसारा ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

शेतसारा हा पारंपरिक कर आहे. इंग्रजांच्या काळापासून जमिनींवर कर लावण्यास सुरुवात झाली. पूर्वी शेतसारा हा महसूल देणारा महत्त्वाचा कर होता. जशी प्रगती होत गेली तशी नवनव्या करांची आकारणी सुरू झाली. मात्र, जमिनींवर आकारल्या जाणार्‍या या कराची वसुली आजही सुरू आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची अंमलबजावणी होते. शेतीचा कर हा अल्प असल्याने या कराची वसुली अपेक्षित प्रमाणे होत नाही. थकबाकीची रक्कम मोठी झाल्यावर हा कर मोठा वाढतो.

थकबाकीची रक्कम ही तलाठी कार्यालयात गेल्यावरच कळते. तसेच, आता घरबसल्या ऑनलाइन सातबारा उतारा असल्याने तलाठी कार्यालयातसुध्दा नागरिकांना जावे लागत नाही. त्यामुळे हा कर वसूल होत नाही. यासाठी आता भूमिअभिलेख विभागाने ई-चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतीचा कर ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरू केले आहे. त्यासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे.

बारामती तालुक्यातील गावात प्रयोग
प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील पाच गावांमध्ये या संगणक प्रणालीचा वापर करून जमीन कर ऑनलाइन भरण्याची सुविधा दिली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. या प्रयोगाच्या यशस्वितेनंतर राज्यभरात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती भूमिअभिलेख विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

Back to top button