पिंपरी : वायसीएममध्ये नेत्र शस्त्रक्रियांसाठी 200 जण ‘वेटींग’वर | पुढारी

पिंपरी : वायसीएममध्ये नेत्र शस्त्रक्रियांसाठी 200 जण ‘वेटींग’वर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : माझ्या एका डोळ्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. मी मूळची लातूर येथील रहिवाशी. काळेवाडीला मुलीकडे आले होते. वायसीएममध्ये मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया होते, असे समजले. त्यामुळे येथे मंगळवारी (दि. 26) शस्त्रक्रिया करून घेतली. शस्त्रक्रियेसाठी मला 15 दिवस थांबण्यास सांगितले होते, असे कमलबाई विभुते (वय 58) सांगत होत्या. त्यांच्याप्रमाणेच आणखी काही रुग्णांनादेखील शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागलेली आहे.

वायसीएममध्ये नेत्र शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी सध्या 200 रुग्ण प्रतीक्षा करीत आहेत. त्यांना तारखांचे नियोजन करून शस्त्रक्रियेसाठी बोलावले जात आहे. मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालय सुरू झाल्यानंतर वायसीएमवरील ताण कमी होईल.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता,
यशवंतराव चव्हाण रुग्णालय व पदव्युत्तर संस्था.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सध्या 15 ते 20 दिवस नेत्र शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना ‘वेटिंग’ करावे लागत आहे. तसेच, सध्या जवळपास 200 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत आहेत. मासुळकर कॉलनी येथे महापालिकेच्या वतीने नेत्र रुग्णालयाचे काम सध्या सुरु आहे. या रुग्णालयात सध्या स्थापत्यविषयक कामकाज तसेच 3 शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्याचे कामकाज केले जात आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालय सुरु होणार आहे. संबंधित रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागात 40 रुग्ण उपचारासाठी दाखल करता येणार आहे. त्यामुळे वायसीएमच्या नेत्ररोग विभागावर सध्या पडणारा ताण कमी होणार आहे.

संत तुकारामनगर येथे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेत्रोपचाराचा स्वतंत्र विभाग आहे. येथील बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी 100 ते 125 रुग्ण डोळ्यांशी संबंधित समस्यांच्या उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यांच्या पापण्यांच्या शस्त्रक्रिया, म्युकरमायकोसिस आजारामुळे करावी लागणारी डोळ्यांच्या खोबणीतील शस्त्रक्रिया तसेच, तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील येथे केली जाते. येथील आंतररुग्ण विभागात शस्त्रक्रियांसाठी सरासरी 20 ते 25 रुग्ण दाखल असतात.

मला मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 10 ते 12 दिवस थांबण्यास सांगितले होते. त्यानुसार आता ही शस्त्रक्रिया बुधवारी (दि. 27) होणार आहे. मी चिंचवडगाव येथील तालेरा रुग्णालयात 9 वर्षांपूर्वी एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली होती. तालेरामधील नेत्र शस्त्रक्रिया बंद असल्याने दुसर्‍या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी वायसीएममध्ये आले आहे.
– शांता झेंडे, काळेवाडी.

Back to top button