पुणे, पुढारी वृत्तसेवा: गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. डीएसके प्रकरणात सुमारे ३५ हजार गुंतवणूकदारांची एक हजार १०० कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोषारोपपत्रही दाखल केले आहे. डीएसके, पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्यासह अनेकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (एमपीआयडी) न्यायालयात गुंतवणूकदारांची फसवणूक (एमपीआयडी) कायद्यानुसार सुनावणी सुरू होती.
तसेच हे प्रकरण ईडीमध्ये देखील दाखल आहे. त्यामुळे मुंबईत एमपीआयडी आणि ईडी दोन्ही प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. खटला सुरू असताना डीएसके यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव आणि ॲड. रितेश येवलेकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. डीएसके यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४००च्या वर आहे.