ताथवडे : पावसामुळे रस्ता चिखलमय | पुढारी

ताथवडे : पावसामुळे रस्ता चिखलमय

ताथवडे : येथील बापूजीबुवानगरकडे जाणारा रस्ता पावसामुळे चिखलमय झालेला असल्यामुळे स्थानिक रहिवासी व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पडणार्‍या पावसाच्या सरींमुळे सगळीकडे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ताथवडे येथील अशोकनगर पुलाखालून बापुजीबुवानगरकडे जाणार्‍या रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू आहेत.

या गृहप्रकल्पाच्या बांधकाम साहित्यासाठी या रस्त्यावरून अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. तसेच, बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी चिखल साचलेला दिसत आहे. चिखल या अवजड वाहनाच्या टायरला लागून रस्त्यावर सर्वदूर पसरतो.त्यामुळे येथील रस्ता चिखल आणि पावसाच्या पाण्यामुळे निसरडा बनला आहे. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांना या रस्त्यावरून प्रवास करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.टायर घसरून दुचाकीचा तोल जाऊन किरकोळ अपघाताच्या घटनाही अलीकडे घडल्या आहेत.

Back to top button