

मोरगाव, पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायत भागातील मोरगाव परिसराला पावसाने हुलकावणी दिल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरीच्या पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. शेतकरीही पिकांना पावसाच्या कमतरतेने चिंतेत आहे.
परिसरात आतापर्यंत रिमझिम पाऊसच झाला आहे. तरीही काही शेतकर्यांनी बाजरीच्या पेरण्या केल्या आहेत; मात्र त्या वाया जाण्याचा संभव आहे. तरडोतील शेतकरी बाळकृष्ण भापकर व हर्षवर्धन भापकर यांनी आपल्या शेतीमध्ये पाण्यासाठी सुमारे 3 लाख रु. खर्चून विहीर खोदली आहे. मात्र, पाणी उपलब्ध झाले नाही. पाणी लागण्यासाठी आणखी सुमारे 5 लाख रुपये खर्च येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
मोरगाव परिसरातील ओढे, नाले, तळी संपूर्णत: कोरडी ठणठणीत पडले आहेत. यामुळे या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाच्या हुलकावणीमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते काय, अशी चिंता व्यक्त होत आहे.