कोंढवा : पाझर तलाव कोरडा ठणठणीत; टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा | पुढारी

कोंढवा : पाझर तलाव कोरडा ठणठणीत; टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा: पाण्यासाठी नेहमी वणवण करणार्‍या वडाचीवाडीतील लोकांना किमान पावसाळ्यात तरी पाझर तलावामुळे दिलासा मिळेल, असे वाटले होते. मात्र, परिसरात पाऊस कमी झाल्यामुळे पाझर तलाव अजून भरला नाही. या तलावात सध्या केवळ पाच ते दहा टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे पावसाळा असूनदेखील परिसरातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पावसाळ्यात अनेक समस्या उभ्या राहिल्या असून, यात पाणीसमस्या मोठी आहे.

या गावांमध्ये महापालिकेने प्लास्टिक टाक्या बसविल्या आहेत. यामध्ये टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्याची कमतरता भासत आहे. यामुळे महापालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी होती, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पंढरीनाथ धनवडे म्हणाले, “जे मिळतय त्यातच समाधान मानायचे. स्वप्न पाहिली होती तशा सुविधा लवकर मिळतील, असे वाटत नाही.” वडाचीवाडी गावालगत डोंगररांगाच्या कुशीत पाझर तलाव असून, या तलावाचा उपयोग वडाचीवाडीसह खालील गावांना होतो.

दोन-तीन वर्षांपूर्वी गावातील युवक व नेत्यांनी लोकवर्गणीतून या तलावातील गाळ काढून त्याची खोली वाढवली होती. हा तलाव उत्तम क्षमतेने भरला की, गाव विहिरींना पाणी येते. सांडेतून पाणी सुरू झाले की, वडाचीवाडी गावाच्या खालील गावांना व शेतीला पाणी मिळते. मात्र, यावर्षी या परिसरात तुलनेने पाऊस कमी पडल्यामुळे आतापर्यंत तलाव कोरडा ठणठणीत आहे. कमी पावसामुळे तलाव कोरडा असल्याचा परिणाम शेतीवरदेखील होत आहे. शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागती सुरू केल्या आहेत. मात्र, पाऊस कमी असल्याने व तलावात पाणी नसल्याने शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण आहे.

महापालिकेसमोर आंदोलनाचा इशारा
पंचक्रोशीतील समाविष्ट गावांचा सर्व आराखाडा तयार करून महापालिका प्रशासनाला दिला आहे. वारंवार वेगवेगळ्या विषयांवर आधिकार्‍यांशी संपर्क केला जात आहे. मात्र, तरीदेखील याकडे काणाडोळा केला जात आहे. याकडे लक्ष न दिल्यास महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच निवृत्ती बांदल यांनी पाझर तलावाची पाहणी करताना दिला.

Back to top button