पुणे : सर्पदंशानंतर डॉक्टरांनी वाचविले रुग्णाचे प्राण | पुढारी

पुणे : सर्पदंशानंतर डॉक्टरांनी वाचविले रुग्णाचे प्राण

मांडवगण फराटा, पुढारी वृत्तसेवा : विषारी सापाने दंश केल्यानंतरही डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. गणेगाव दुमाला (ता.शिरूर) येथे ही घटना घडली.

गणेगाव दुमाला येथील पंडित दिगंबर इंगळे (वय 55) हे शेतात काम करत असताना विषारी घोणस जातीच्या सापाने त्यांच्या उजव्या हाताला दंश केला होता. त्यांना कुटुंबीयांनी तातडीने मांडवगण फराटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. सापाच्या उपचारासाठी लागणारे इंजेक्शन मिळणे गरजेचे होते. त्यांनी धावपळ करून शिरूर व दौंड तालुक्यातून ही लस उपलब्ध केली.

डॉक्टरांनी सातत्याने रुग्णाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून उपचार केले. विषारी सापाचा दंश असल्याने विशेष काळजी घेणे गरजेचे होते. त्यादृष्टीने डॉक्टरांनी तब्बल पाच दिवस अतिदक्षता विभागात उपचार केले. दरम्यान, 74 लसींची मात्रा रुग्णाला दिली व रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. रुग्णाला वाचविण्यासाठी डॉ. नीलेश कटकदौंर, डॉ.मनोज भोसले, डॉ.सुनील पवार, डॉ.अजित गरड, डॉ.अभय घोडके यांच्यासह स्टाफने विशेष मेहनत घेतली. रुग्णाचा मुलगा राहुल व नातेवाइकांनी लस मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान, इनामगाव येथील छाया मचाले यांनाही शेतात काम करत असताना सर्पदंश झालेला होता. त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचाही जीव बचावला. परिसरात गेल्या दोन दिवसात सर्पदंशाची घडलेली ही दुसरी घटना आहे.

पावसाळ्यात शेतात काम करताना सर्पदंशाच्या घटना घडत आहेत. शेतकर्‍यांनी काम करत असताना दक्षता घ्यावी. साप चावल्यास घाबरून न जाता त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल व्हावे.

– डॉ. मंजूषा सातपुते, वैद्यकीय अधिकारी

गणेगाव येथील रुग्णाला साप चावल्यानंतर त्वरित रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णाची प्रकृती खालावत चालली होती, पण वेळेत निदान व उपचार केल्याने त्याचे प्राण वाचवता आले.

– डॉ. सुनील पवार

Back to top button