परवानगी मिळाली, पण मूर्ती कुठे? आदेश उशीरा मिळाल्याने उंच मूर्तीची ऑर्डरच नाही | पुढारी

परवानगी मिळाली, पण मूर्ती कुठे? आदेश उशीरा मिळाल्याने उंच मूर्तीची ऑर्डरच नाही

पिंपरी : कोरोनाच्या दोन वर्षांच्या लॉकडाउननंतरयावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे चार फुटांपर्यंत मूर्ती तयार करण्यास परवानगी होती. यंदा दहा फुटांपर्यंत मूर्ती बसविता येत असली, तरी आदेश उशिरा निघाल्यामुळे मूर्तिकारांकडे लहान मूर्तींची ऑर्डर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. कोरोनापूर्वी गणेशोत्सव मंडळांकडून मूर्तिकारांना आठ ते दहा फुटांच्या मूर्तीची ऑर्डर यायची. परंतु, मागील दोन वर्षांत कोरोनामुळे मूर्तीच्या उंचीवर निर्बंध आले होते. यावर्षी शासनाकडून गणेशोत्सवासाठी लवकर कोणतेही आदेश मिळाले नव्हते. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

मूर्तिकारांनी दरवर्षीप्रमाणे जून महिन्यापासून मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले.तसेच, आदेश नसल्याने मंडळांच्या ऑर्डरही त्यांना मिळाल्या नाहीत. त्यामुळे अर्ध्या फुटापासून ते चार फुटांपर्यंत मूर्ती उपलब्ध आहेत. शासनाने उत्सवावरील निर्बंध काही दिवसांपूर्वी हटविले आहेत; पण आता आठ ते दहा फुटांच्या मूर्ती तयार करणे शक्य नाही. सध्या कारखान्यामध्ये तयार केलेल्या मूर्तीचे रंगरंगोटीचे काम सुरू आहे. घरगुती गणेश मूर्तीचे बुकिंग जोरात आहे; पण अद्याप मंडळाकडून बुकिंगचे प्रमाण कमी असल्याचे कारखानदार सांगतात.

मूर्तींचा तुटवडा राहणार

आदेश उशिरा आल्यामुळे अडीच, तीन, चार आणि सहा फुटांच्या मूर्तींचाही तुटवडा राहणार आहे. जास्ती फुटांच्या मूर्तींना कसा प्रतिसाद मिळेल, याबाबत संभ्रम होता. त्यामुळे काही कारागीर गेल्या वर्षीच्या तीन ते सहा फुटांच्या जुन्या मूर्तींना पॉलिश करून रंगरंगोटी करून विक्रीस ठेवणार आहेत, असे एका मूर्ती कारागीराने सांगितले.

Back to top button