पुणे; पुढारी वृत्तसेवा: तांत्रिक समस्येमुळे महाराष्ट्रात सोमवारी (दि.25) विविध जिल्ह्यांतील पासपोर्ट कार्यालयांतील कामकाज ठप्प होते. पुण्यातही मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्राबाहेर नागरिकांनी कार्यालयीन कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. जवळपास दोन तास बहुसंख्येने जमलेल्या नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागल्यामुळे नागरिक वैतागले होते. केवळ तांत्रिक समस्येचे कारण असल्याचे पासपोर्ट सेवा केंद्रातील अधिकारी सांगत होते, परंतु नवीन व्हर्जन डाऊनलोड करण्यापूर्वी नागरिकांना कळविले असते तर नागरिकांचा संपूर्ण दिवस वाया गेला नसता. पासपोर्टचे काम वेळेवर झाले नाही. त्यामुळे नाराज झालेले नागरिक संताप व्यक्त करत होते.
सकाळी दहा वाजता सर्व्हर डाऊन झाला, परंतु पासपोर्टसाठी सकाळपासूनच अनेक नागरिक पासपोर्ट कार्यालयाकडे येत होते. दोन अडीच तास होऊन गेले तरीही पासपोर्टचे काम सुरू झाले नाही. परिणामी, नागरिकांना मात्र हकनाक त्रास सहन करावा लागला.
पासपोर्ट ऑफिसतर्फे नवीन व्हर्जन डाऊनलोड करण्याबाबतची पूर्वसूचना नागरिकांना मिळाली असती, तर त्यांचा हेलपाटा वाचला असता. हकनाक त्रास झाला नसता, परंतु पासपोर्ट कार्यालयाने यासंबंधी काहीही पूर्वसूचना दिली नाही. मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्रांबाहेरही नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
तसेच पासपोर्ट अधिकार्यांच्या कामकाजाबद्दल संतापही व्यक्त केला होता. मुंढवा येथील कार्यालयाच्या बाहेर अनेकदा नागरिक रस्त्यावर रांगेत उभे असतात. त्यांना आतमध्ये बसण्यासाठीची व्यवस्थाही पुरेशी नसते. अनेकजण लांबून लांबून पासपोर्टसाठी तेथे जातात. सोमवारीही अनेकजण सकाळपासूनच मुंढवा येथे गेले होते, परंतु सर्व्हर डाऊन झाल्याचे मोघम कारण देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. दुपारनंतर अखेर सर्व्हर सुरू झाल्याचे सांगण्यात आले.