पुणे शहर जाणार समस्यांच्या विळख्यात; लोकसंख्येमुळे परिस्थिती होणार गंभीर

पुणे शहर जाणार समस्यांच्या विळख्यात; लोकसंख्येमुळे परिस्थिती होणार गंभीर
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा; पुण्याची शहरी लोकसंख्या येत्या तीन दशकांत एक कोटी पंधरा लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्या वेळी पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण या नागरी समस्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज अमेरिकेतील स्टेनफोर्ड विद्यापीठाच्या पथकाने पर्यावरणविषयक संशोधन अहवालात नमूद केला आहे. त्यांनी हा अहवाल पुणे महापालिकेला सोमवारी (दि. 25) सुपूर्त केला. अन्न, पाणी व ऊर्जा याविषयी नागरी जीवन पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध राहावे, या उद्देशाने त्यांनी पुण्याचा अभ्यास केला. शतकोत्तर रौप्यमहोत्सव पूर्ण केलेले हे विद्यापीठ संशोधनासाठी नावाजलेले आहे.

अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने हा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला. अभ्यासासाठी त्यांनी गेली तीस वर्षे आणि पुढील तीस वर्षे असा कालावधी निवडला. त्यांच्या अंदाजानुसार उन्हाळ्यात पुण्याचे तापमान सध्यापेक्षा दोन डिग्रीने वाढणार आहे. तसेच, पावसाचे प्रमाणही सध्याच्या तुलनेत सात टक्क्यांनी वाढेल. त्यामुळे मोठे पूर येण्याची शक्यता आहे, तसेच काही वर्षे दुष्काळाची तीव्रता वाढेल. सध्याची शहरी भागातील 60 लाख लोकसंख्या ही 2050 मध्ये 1 कोटी 14 लाखांवर पोहचेल.

सुचविलेले पर्याय
सर्वांना पुरेसे पाणी देण्यासाठी त्यांनी सुचविलेल्या उपायांमध्ये दरमहा नदीचा प्रवाह वाहता ठेवावा, त्यामुळे भूजलाची पातळी वाढून स्थिरावेल, असे म्हटले आहे. धरणसाठ्याचे व्यवस्थापन व पिकासाठी पाण्याचा वापर, याचे नियोजन करावे लागणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महापुराचा धोका
गेल्या चाळीस वर्षांत 1780 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पाच वर्षे पडला. मात्र, आगामी 40 वर्षांत 24 वर्षे हे अधिक पावसाचे असतील. त्यामुळे मोठे पूर येण्याचा धोका असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विशेषतः नदीच्या परिसरात पूरस्थिती सध्याच्या तुलनेत वाढण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

दुष्काळात पाणीपुरवठ्याची कसोटी
तीन ते चार वर्षे दुष्काळी ठरणार असून, त्या वेळी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची कसोटी लागेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. या काळात भूजलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. घनकचरा, वायुप्रदूषण या समस्या वाढण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news