

पुणे : ट्रॅव्हल्स चालकांच्या एजंटांकडून एसटीच्या स्वारगेट, पुणे स्टेशन, वाकडेवाडी स्थानकांतील प्रवासी पळविण्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होत असून, हे एजंट अक्षरश: एसटी स्थानकांमध्ये घुसून एसटी अधिकार्यांना न जुमानताच प्रवाशांना घेऊन जात आहेत. त्यांच्यामुळे एसटी अधिकार्यांच्या नाकीनऊ आले आहे. एसटीने बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना कमी तिकीट दराचे आमिष दाखवून ट्रॅव्हल्स गाड्यांमध्ये भरून घेऊन जाणार्या ट्रॅव्हल्स एजंटांनी एसटी स्थानकात धुमाकूळ घातला आहे.
एसटी अधिकार्यांनी याबाबत अनेकदा पोलिसांत तक्रारीदेखील केल्या आहेत. मात्र, या एजंटांना काहीही फरक पडत नसल्याचे दिसत आहे. असे प्रकार एसटीच्या स्वारगेट, वाकडेवाडी आणि पुणे स्टेशन येथील स्थानकांवर सर्रासपणे घडत आहेत. याचा तातडीने बंदोबस्त आरटीओ आणि पोलिस प्रशासनाने करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
रात्र ट्रॅव्हल्स एजंटांचीच…
मध्यरात्रीच्या वेळी अचानक होणार्या प्रवासासाठी एसटीच्या गाड्या कमी असतात. गाडी उपलब्ध नसल्याचा फायदा घेत प्रवाशांकडून ट्रॅव्हल्स चालक आणि त्यांचे एजंट अवाच्या सव्वा दर आकारतात. प्रवाशांनाही नाइलाजास्तव ज्यादा पैसे मोजावे लागतात. स्वारगेट, वाकडेवाडी, पुणे स्टेशन परिसरात असे सर्रासपणे घडत असताना त्यांच्यावर कारवाईसाठी कोणतीही प्रशासकीय यंत्रणा रात्रीची जागी नसते. त्यामुळे मध्यरात्र ही ट्रॅव्हल्स एजंटांचीच झाली आहे.
एसटी स्थानकातून प्रवाशांना घेऊन जाण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. यासंदर्भात आम्ही अनेकदा तक्रारी दिल्या आहेत. कारवाई झाली की पुन्हा रुबाबात 15 मिनिटांनी स्थानकावर ते उभे असतात. त्यामुळे यांचा आरटीओ, पोलिस प्रशासनाने कायमचा बंदोबस्त करायला हवा.
– ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणेएसटी स्थानक परिसरात असणारे काही स्थानिक लोक असे प्रकार करीत असतात. यांचा व आमचा काहीही संबंध नाही. आमच्या संघटनेचे लोक असे प्रकार करीत नाहीत. अशा लोकांवर आरटीओ, पोलिसांनी कारवाई करावी. आमच्या गाड्या स्थानकापासून खूप लांब असतात.
– राजन जुनवणे, अध्यक्ष, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनअसे प्रकार करणारे आमच्या संघटनांचे नाहीत. अशा लोकांना आणि त्यांच्या एजंटांवर आरटीओने तत्काळ कारवाई करावी. आम्ही अशा गैरप्रकारांना प्रोत्साहन देत नाही.
– बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष, पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन