वडगावच्या बाजारपेठेत गावठी पिस्तुल बाळगणारा जेरबंद | पुढारी

वडगावच्या बाजारपेठेत गावठी पिस्तुल बाळगणारा जेरबंद

वडगाव मावळ; पुढारी वृत्तसेवा: बेकायदेशीररित्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या एका आरोपीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वडगाव मावळ येथील बाजारपेठेत रंगेहात पकडले. स्वप्नील किसन मु-हे (वय ३३, रा. सोमाटणे,ता.मावळ जि.पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या जवळ १ गावठी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आली आहेत.

‌‌‌‌‌‌पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२५) पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूनाच्या गुन्ह्याचा तपासात असताना, सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांना वडगाव मावळ येथिल एका व्यक्तीकडे बेकायदेशीर पिस्तूल असल्याची  गोपनीय माहिती मिळाली होती.  त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, सहाय्यक  उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, हनुमंत पासलकर, पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव, प्राण येवले, सुरेखा लोंढे, नंदा कदम, सुजाता कदम यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीस अटक केली.

त्याची अंगझडती घेतली असता त्यांचेकडून  विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने कमरेला बाळगलेले १ गावठी पिस्तुल, मॅगझीन मध्ये २ जिवंत काडतुस आणि दुचाकी असे एकुण ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला आहे. ‌‌ आरोपीस पुढील कारवाईसाठी वडगांव मावळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Back to top button