पुणे : चार भिंतींतील शिक्षणाने कैद्यांच्या आयुष्याला नवी दिशा; शिक्षेचा कालावधी झाला कमी | पुढारी

पुणे : चार भिंतींतील शिक्षणाने कैद्यांच्या आयुष्याला नवी दिशा; शिक्षेचा कालावधी झाला कमी

अशोक मोराळे

पुणे : विविध प्रकारच्या गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या 65 कैद्यांची शिक्षा 90 दिवसांनी कमी करण्यात आली आहे. राज्य कारागृह सुधारसेवा व पुनर्वसन विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. सुनील रामानंद यांनी सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाचा लाभ दोन वर्षांत अनेक कैद्यांनी घेतला आहे. एक पदवी घेतली, की त्यांच्या शिक्षेतील 90 दिवसांचा कालावधी निर्धारित केलेल्या नियमानुसार कमी केला जातो. त्यामुळे आता शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण झाली आहे.

या कारागृहांतील कैद्यांनी घेतले शिक्षण
राज्यातील एकूण 21 विविध प्रकारच्या कारागृहांतील कैद्यांपैकी सर्वाधिक ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी पदवी मिळवली आहे. यामध्ये 2014 ते 2021 या सात वर्षांच्या कालावधीत ठाणे कारागृहातील 561 पुरुष, तर 07 महिला कैद्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर नाशिक कारागृहात 338 पुरुष, तर 03 महिला, औरंगाबाद कारागृहातील 235 पुरुष, 53 महिला, पुणे येथील येरवडा कारागृहातील 202 पुरुष व 29 महिला, तळोजा कारागृहातील 104 पुरुष, कल्याण कारागृहातील 86 कैद्यांनी पदवी प्राप्त केली आहे.

बंदीवानांसाठी प्रेरणापथही सुरू
अनवधानाने किंवा रागाच्या भरात अनेकांकडून गुन्हेगारी कृत्य घडते. केलेल्या चुकीमुळे कायद्याने दिलेली शिक्षा भोगावी लागते. ती शिक्षा पूर्ण करून आल्यानंतर देखील नातेेवाईक, समाज त्या व्यक्तीला स्वीकारण्यास तयार होत नाही. त्यामुळे त्यांच्या उदर्निवाहाचा प्रश्न निर्माण होतो. पण, त्या व्यक्तीला पुन्हा सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे. या हेतूने पुण्यातील सामाजिक संस्थांनी ‘गुन्हेगार दत्तक योजना’ व ‘प्रेरणापथ’ योजनांच्या माध्यमातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. हे कैदी आता समाजात स्वतःच्या पायावर उभे राहून चांगले जीवन जगत आहेत.

पदवी प्रकार        पुरुष कैदी      महिला कैदी
पदव्युत्तर पदवी        9                    02
पदवी                   409                  18
पदविका               102                  02
इतर अभ्यासक्रम   1179                100
(आकडेवारी 2014 ते 2021)

Back to top button