देहूरोड : तुकोबाचा पालखी सोहळा देहूत विसावला | पुढारी

देहूरोड : तुकोबाचा पालखी सोहळा देहूत विसावला

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा:

विठ्ठल प्रेमाचा पुतळा । विठ्ठल कृपेचा कोवळा ॥
विठ्ठल जिवीचा जिव्हाळा । लावियेला चाळा विश्वा विठ्ठले ॥
अशा विठ्ठलाची भेट झाली आणि जीवन सफल झाले. आता आनंदाने आपले काम करूयात, असा भोळा भक्तीभाव पंढरीची आषाढी वारी करून देहूत माघारी परतलेल्या विठ्ठल भक्तांच्या चेहर्‍यावर दिसत होता. श्री संत तुकाराम महाराज आषाढी पालखी सोहळा रविवारी सकाळी देहूमध्ये परतला.

रविवार (दि. 24) पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. त्यात विठुनामाचा गजर सुखावून टाकीत होता. शनिवारी पिंपरी गावातील मुक्काम पालखीने आटोपला. सकाळी देवाची आरती झाल्यावर पालखी देहूकडे मार्गस्थ झाली. सकाळी नऊ वाजता ती खंडोबा देवस्थान, निगडी येथे विसावली. या ठिकाणी वारकरी भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्यात आला.

पालखी सोहळ्याने अभंग आरती म्हटली. वारकरी आनंदाने नाचत गात होते. येथून पालखीने अनगडशाह वली दर्गा येथे कूच केले. दर्ग्याजवळ आल्यानंतर पुन्हा अभंग आरती झाली. यावेळी संस्थानचे नितीन महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संजय महाराज मोरे, अभिजीत महाराज मोरे आदी उपस्थित होते.

अनगडशाह वली दर्ग्यातून अभंग आरती करून सोहळा हळूहळू पुढे सरकू लागला. संत तुकाराम महाराज कमानीजवळ पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मानाचा अभंग झाला. पालखी सोहळा देहूतील मंदिराजवळ आल्यावर अभंग आरती व नंतर मंदिर प्रदक्षिणा झाली. पावणे तीनला कमानीतून पालखीने प्रवेश केला. तीनच्या सुमारास अहिल्या देवी भजनी मंडपात पालखी ठेवण्यात आली. वारी पूर्ण करणार्‍या मानकर्‍यांचा यावेळी नारळ, प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.

Back to top button