पुणे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा; शिंदे गटाचे नाना भानगिरे यांची मागणी | पुढारी

पुणे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा; शिंदे गटाचे नाना भानगिरे यांची मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील रस्त्यांवर पावसाळ्यामुळे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, तसेच अपघातही होत आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. भानगिरे यांच्यासह खडकवासला विभाग प्रमुख नीलेश गिरमे, शिवाजीनगर विभाग प्रमुख संजय डोंगरे, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष उल्हास तुपे यांनी आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. भानगिरे म्हणाले, “ शहरात वाहतूक कोंडी होत असून, अपघातांची संख्याही वाढली आहे.

हडपसर येथेही दोन दिवसांपूर्वी अशाच वाहतुकीमुळे बाप-लेकीचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करावी. हडपसर भागातील सय्यदनगर येथील भुयारी मार्गाचे काही काम रखडलेले असल्याने या भागात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे प्रशासनाने या मार्गाचे काम वेगाने करावे.

” पीएमपीच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाचे वेतनही तातडीने द्यावे, अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्तांनी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचेही भानगिरे यांनी सांगितले. महापालिका शाळांसाठी माध्यान्ह भोजन पुरविण्यासाठी काढण्यात आलेल्या ‘सेंट्रल किचन’च्या निविदेस मुदतवाढ देण्याची मागणीही शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. या निविदांसाठी देण्यात आलेली मुदत कमी असल्याने ही मागणी केल्याचे नाना भानगिरे यांनी सांगितले.

Back to top button