जे नेते पक्षातून गेले त्यांनी संघटना किती वाढवली हा प्रश्नच : आमदार सचिन अहिर | पुढारी

जे नेते पक्षातून गेले त्यांनी संघटना किती वाढवली हा प्रश्नच : आमदार सचिन अहिर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यशस्वी झाले तर देशाचे नेतृत्व करतील या भीतीपोटी देशपातळीवर षड्यंत्र रचले गेले, असा आरोप शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी केला. आकुर्डी येथे शनिवारी शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक झाली, या वेळी ते बोलत होते. बैठकीस शिवसेना उपनेत्या निलम गोर्‍हे, शहरप्रमुख सचिन भोसले, महापालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे, शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी सचिन अहिर म्हणाले, की काही झाले तरी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. परवा आपल्याकडून गेलेले नेते आले तेव्हा त्यांच्या मागे एअरपोर्टला कोणी दिसते का हे आम्ही पाहत होतो. मात्र, त्यांच्या सोबत कोणी दिसले नाही. जे नेते पक्षातून गेले त्यांनी संघटना किती वाढवली, किती आमदार, किती नगरसेवक निवडून आणले हा प्रश्नच असल्याची टीका अहिर यांनी खासदार श्रीरंग बारणे व आढळराव पाटील यांचे नाव न घेता केली.

नीलम गोर्‍हे म्हणाल्या, की सध्या शिवसेनेतून आमदार बाहेर पडले आहेत. अशा गद्दारांकडे लक्ष न देता पक्ष संघटना वाढीकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. पिंपरी चिंचचवड महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. माजी आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, की विधानसभेला तुला मी तिकीट दिले असे श्रीरंग बारणे सांगतात. मात्र, ते चुकीचे आहे. मला त्यांनी नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिले होते. त्यामुळे काही झाले तरी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहणार असल्याचे चाबुकस्वार यांनी सांगितले.

सुलभा उबाळे म्हणाल्या, की केवळ पक्ष सोडून गेलेल्यांना शिव्याशाप देऊन चालणार नाही. तर, प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला हवे. पक्षाचे काम सामान्यांपर्यंत पोचवायला पाहिजे.

Back to top button