नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची आवक घटली | पुढारी

नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची आवक घटली

नारायणगाव;  पुढारी वृत्तसेवा: टोमॅटोसाठी प्रथम क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारपेठेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या मे, जून, जुलै या महिन्यांतील हंगामात अंदाजे 10 लाख 34 हजार टोमॅटो क्रेटची आवक कमी झाल्याचे बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक शरद धोंगडे यांनी सांगितले. सध्या बाजारामध्ये 20 किलोच्या टोमॅटो क्रेटला 100 ते 350 चा भाव मिळत आहे. मार्च, एप्रिलमधील आगाप लागवडीमधील टोमॅटो रोपांची उष्णतेमुळे झालेली मर, तर अतिरिक्त पावसामुळे शेतात साठलेल्या पाण्यामुळे झालेली सड, याचा परिणाम उत्पादनावर झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यंदा मार्च, एप्रिल महिन्यांत लागवड झालेल्या टोमॅटोचे उत्पादन मे व जून महिन्यांत निघाले होते. त्या वेळेला बाजारामध्ये टोमॅटोची आवक कमी असल्याने 500 ते 1 हजार रुपयांचा विक्रमी भाव 20 किलोच्या एका टोमॅटो क्रेटला मिळाला होता. मात्र, पुढे जून व जुलै महिन्यांत बाजारात आवक वाढल्याने दरात घसरण झाली.नारायणगाव बाजारपेठेला जवळ असणार्‍या येडगाव या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली जाते. मात्र, यंदा केलेल्या लागवडीमध्ये टोमॅटो रोपांची मोठ्या प्रमाणात मर झाली.

वातावरणात असणारी उष्णता हे जरी याच्या मागील कारण असले, तरी एकाच शेतामध्ये वर्षातून चार पिके घेतली जात असल्याने व रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने जमिनीचा पोत कमी होऊन शेतात बुरशी निर्माण झाल्याने रोपांची मर होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत, त्यामुळे येडगाव परिसरात टोमॅटोचे उत्पादन यंदा अतिशय कमी प्रमाणात निघाले आहे. आजमितीला जुन्नर तालुक्यातील ओतूर, उदापूर, आंबेगव्हाण, मांदारणे, डिंगोरे, बनकर फाटा या भागांतून टोमॅटो नारायणगाव बाजार समितीमध्ये येत असून, पुढील येणार्‍या दिवसांत पुन्हा पाऊस झाल्यास त्याचा फटका टोमॅटो उत्पादनावर होऊन बाजारपेठेतील आवक कमी होण्याची शक्यता आहे.

पावसामुळे टोमॅटोवर चिकटा, काळा ठिपका, चीर जाणे, टोमॅटो सडण्याचे प्रमाण याचा प्रादुर्भाव अधिक आहे. शेतकर्‍यांनी प्रतवारी करून आणलेले टोमॅटोसुद्धा नारायणगाव बाजारपेठेत पुन्हा प्रतवारी करून दुसर्‍या दिवशी पुढील बाजारपेठेत जाण्यापूर्वी सडून खराब होताना दिसत असल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर होत आहे. दरम्यान, दरवर्षी टोमॅटो हंगामात दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून मोठ्या प्रमाणात व्यापारी नारायणगाव बाजारपेठेत येत असतात.

मात्र, यंदा टोमॅटोची आवक कमी असल्याने व्यापारी बाजारपेठेत कमी प्रमाणात आल्याने बाजारपेठेतील उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. ऑगस्ट महिन्यात श्रीगोंदा, बारामती, बीड, दौंड, शिरूर, पारनेर या तालुक्यांतून नारायणगाव बाजारपेठेत टोमॅटोची आवक होत असते. या वर्षी पावसामुळे ही आवक किती प्रमाणात होईल, हे अनिश्चित आहे. टोमॅटोला बाजार असल्यावर अवघ्या काही दिवसांत लाखो रुपये हातात मिळविणार्‍या शेतकर्‍याच्या पदरी चालू वर्षी मात्र निराशा हाती आली आहे.

गेल्या दोन वर्षात झालेली एकूण टोमॅटो क्रेटची आवक, बाजारभाव, झालेली उलाढाल
वर्ष व महिना     आवक (क्रेटमध्ये)            बाजार भाव प्रतिक्रेट        एकूण उलाढाल रक्कम
मे 2021         2 लाख 32 हजार 770               50 ते 200                     2 कोटी 99 लाख 38 हजार
जून 2021      7 लाख 81 हजार                    50 ते 180                         8 कोटी 18 लाख
जुलै 2021      12 लाख 56 हजार             340 100 ते 300                   21 कोटी 23 लाख
मे 2022          2 लाख 25 हजार              355 500 ते 1000               14 कोटी 67 लाख
जून 2022       3 लाख 96 हजार                   500 ते 1000                   25 कोटी 45 लाख
जुलै 2022       4 लाख 32 हजार             670 100 ते 350                   10 कोटी 81 लाख

पावसामुळे शेतकर्‍यांनी प्रतवारी करून आणलेल्या टोमॅटोची पुन्हा प्रतवारी करून इतर बाजारपेठांत पाठविल्यावर टोमॅटो सडण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा फटका व्यापार्‍यांना बसत आहे. चिलटा, काळा ठिपका व चीर पडलेले टोमॅटो बाजूला काढून ते सॉस बनविणार्‍या कंपनीला पाठवली जात असल्याने कमी दराने का होईना शेतकर्‍यांना त्या माध्यमातून दोन पैसे मिळत आहेत.

                                                          – सतीश घोलप, टोमॅटो व्यापारी

Back to top button