पिंपरी : शहरातील तेरा शिल्प कपड्यात झाकून | पुढारी

पिंपरी : शहरातील तेरा शिल्प कपड्यात झाकून

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहर सुशोभीकरणासाठी टाकाऊ साहित्यांतून तयार केलेले विविध शिल्प पिंपरी-चिंचवड शहरातील चौकाचौकात उभारण्यात आले आहेत. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून ते शिल्प कापडात झाकून ठेवल्याने चौक विद्रुप दिसत आहेत.
पालिकेच्या विविध विभागाच्या गोदामातील टाकाऊ साहित्यातून विविध 15 सुंदर कलाकृती तयार करण्यात आल्या.

मोरवाडी चौकात घोडा, पिंपळे निलख येथे हत्ती, रावेत येथील मुकाई चौकात मावळा, पिंपळे निलख जंक्शन चौकात बिबटा, साई चौकात पान खाणारे सुरवंट, नाशिक फाटा चौकात बैल, कुदळवाडी रोटरी चौकात कार्ट टू कार, केएसबी चौकात डिजिटल बॉक्स, डांगे चौकात फ्लॉवर ऑफ पॅरडाइज, दिघी मॅगझिन चौकात पालखी यात्रा, निगडी भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकात मोर, दुर्गादेवी टेकडीवर खार, पिंपळे सौदागरच्या कोकणे चौकात जीवनचक्र, निसर्ग, मानवाचे नाते, गुढीपाडवा अशी शिल्पे उभारण्यात आली. त्या भोवती चौथरा तयार करण्यात आला.

त्यातील पालखी यात्रा शिल्पाचे अनावरण पालखी सोहळ्यानिमित्त करण्यात आले आहे. तर, एका लोकप्रतिनिधीच्या विरोधामुळे थेरगावातील फ्लॉवर ऑफ पॅरडाइज शिल्प हलविले. उर्वरित 13 शिल्पे अनावरण न झाल्याने कापड्यात झाकून ठेवण्यात आले आहेत. तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 11 जूनला या शिल्पाचे अनावरण करण्यात येणार होते. मात्र, काही कारणांमुळे तो दौरा रद्द झाला. तेव्हापासून हे शिल्प झाकून ठेवले आहेत.
पावसामुळे ती कापड खराब झाले आहे. परिणामी, चौक विद्रुप दिसत आहेत. या शिल्पाचे तातडीने अनावरण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Back to top button