पुणे : मुले वाचायलाच विसरली; विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा वाचनक्षमता वाढविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान | पुढारी

पुणे : मुले वाचायलाच विसरली; विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा वाचनक्षमता वाढविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दोन वर्षांनंतर ऑफलाइन शिक्षण सुरू झाले खरे; परंतु वर्गातील शिक्षणाची सवय मोडल्याने विद्यार्थी चक्क वाचयालाही विसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना देखील पुन्हा एकदा वाचायचे शिकवावे लागत असल्याचे खुद्द प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता येण्यासाठी काम सुरू करून गुणवत्तावाढीवर भर दिला आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर आता पूर्णवेळ शाळा सुरू आहेत. त्यामुळे मुलांसह शिक्षक थेट वर्गात दिसू लागले आहेत. परंतु, विद्यार्थी एका ठिकाणी बसत नसल्याने तसेच त्यांच्या आकलनाच्या काही समस्या समोर आल्याने त्याची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे.

सध्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये अध्यापन सुरू असताना एका ठिकाणी बसवून ठेवणे आणि त्यांच्या एकाग्रतेकडे शिक्षकांना खास लक्ष द्यावे लागत आहे. अक्षरांची ओळख नाही अशा अनेक तक्रारी पालकांच्या येत असल्या, तरी शिक्षकांचेही तसेच निरीक्षण असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. ऑनलाइन शाळांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आवाज ऐकू येत होता. मात्र, त्या वेळी संवाद होत नव्हता. आता ऑफलाइन शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक पुन्हा समोरासमोर आहेत. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी संवाद अधिक कसा वाढेल, यावर भर दिला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना असलेल्या समस्या शिक्षक समजावून घेतील आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

उपक्रमांऐवजी गुणवत्तेवर भर…
आतापर्यंत शिक्षकांना विविध उपक्रम वर्गात राबविण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. त्यामुळे शिक्षक शिकवण्याबरोबर उपक्रमांमध्ये व्यस्त होते. आता वारंवार विविध प्रकारच्या उपक्रमांमध्ये त्यांना गुंतवून ठेवण्यात येणार नाही. त्याऐवजी दोन वर्षांच्या काळानंतर ‘ऑफलाइन’ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची घसरलेली गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता यायला हवे. अक्षरांची ओळख व्हायला हवी. त्याशिवाय मूलभूत ज्ञानाच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर आता भर देणार असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांनी सांगितले.

ऑनलाइन शाळेनंतर विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाची गोडी लागावी, याकडे लक्ष देत आहोत. शिकवलेल्या ज्ञानाचे आकलन व्हावे आणि त्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

                            –संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद

Back to top button