इंदापूर : शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रेंवर विनयभंगाचा गुन्हा | पुढारी

इंदापूर : शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रेंवर विनयभंगाचा गुन्हा

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: राज्यात शिवसेना आमदार खासदारांच्या बंडानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जिल्हा व तालुका पातळीवर संघटनेची मोट बांधण्यासाठी जोरदार हलचाली सुरू आहेत. त्यातून ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी स्वतः पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यभर शिवसेना संवाद यात्रेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते तालुका स्तरावर कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. २२ जुलै ला आमदार सचिन अहिर यांनी इंदापूरात येऊन पक्षाची बांधणी केली.

मात्र रात्र ओलांडते ना तोच २३ जुलै रोजी शिवसेना जिल्हा समन्वयक इंदापूरचे विशाल बोंद्रेवर शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकचं खळबळ उडाली आहे. या पिडित महिलेने १५ जुलै रोजी आपल्यावरील अन्यायाबाबत पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांना संबंधितावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्यासाठी निवेदन दिले आहे. त्यानंतर तब्बल एक आठवडा ओलांडल्यानंतर इंदापूर पोलिसांत २३ जुलै रोजी विशाल बोंद्रेविरूद्ध भादंवी कलम ३५४ नुसार सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार ही घटना १४ जुलै रोजी इंदापूर शहरातील पक्ष कार्यालयात घडली आहे. पक्षाच्या आठ महिला पदाधिकारी कार्यालयात असताना बोंद्रे यांनी आपल्याला उद्देशून ‘मी सांगेल तसेच वागायचे, इतर कोणाचेही ऐकायचे नाही, अन्यथा पक्षातून हकालपट्टी करेल’ अशी धमकी दिली व त्यानंतर महिला फोटो काढत असताना पाठीमागे उभे राहून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची फिर्याद या महिलेने दिली आहे.

माझे कुटुंब उध्वस्त करण्याचा प्रयत्न, यावर मी काय बोलू? विशाल बोंद्रे

दरम्यान बोंद्रे यांनी हा आरोप फेटाळला. ते म्हणाले, ३५ वर्षे मी समाजकारणात आहे. संपूर्ण इंदापूर तालुका मला ओळखतो, मी कसा आहे हे सर्वांना माहिती आहे. माझे तालुक्याच्या संघटनेवरील असलेले वर्चस्व लक्षात घेऊन गटबाजी करणाऱ्यांनी हे कृत्य केले आहे. मात्र यातून माझे कुटुंब उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामुळे मी उद्वीग्न झालो आहे. अशीच जर सवय लागली, तर कोणीही कोणालाही उध्वस्त करु शकतात. आता यावर मी काय बोलू?

Back to top button